पणजी: आमच्या मतदारसंघात प्रचार करायला येऊ नका असे मेसेज मलाही आले. कुठून कुठून मेसेज आले हे सांगणं योग्य राहणार नाही. पण निरोप नक्की आले. कुठून आले, कुणाकडून आले आणि कोणत्या पक्षाकडून आले हे सांगणं योग्य नाही. राजकीय कोड असतं. ते पाळलं पाहिजे. म्हणून मी कोणत्याही पक्षाचे नाव घेणार नाही, असं महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) म्हणाले. त्यामुळे आदित्य यांना कोणत्या पक्षाने प्रचार न करण्याचे निरोप दिले यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. आमचा पक्ष गोव्यात कमजोर आहे. आमचं डिपॉझिट जाणार आहे तर आमच्यावर बोलता कशाला? भीती कशाची वाटते? होऊ दे प्रचार, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. तसेच येणाऱ्या काळात गोव्यातील (GOA) प्रत्येक गावात शाखा निर्माण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गोवा विधानसभेनंतर लोकसभा (loksabha) निवडणुकीची तयारी करणार असल्याचंही आदित्य यांनी जाहीर केलं.
आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं. आम्ही गोव्यात 11 जागा लढवत आहोत. रिपोर्ट येत आहेत. ते फार बोलके आहेत. घरोघरी शिवसेना पोहोचली आहे. शिवसेनेचं चिन्हं धनुष्यबाण घरोघरी गेलं आहे. शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना म्हणून गोव्यात ही निवडणूक लढत असताना प्रत्येक राज्यात प्रत्येक स्तरावर निवडणूक लढणार आहोत. प्रत्येक राज्यात आम्ही आता विधानसभा, लोकसभा, जिल्हापरिषद आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार आहोत. महाराष्ट्राच्या बाहेरही शिवसेनेची गरज जाणवत आहे. महाराष्ट्राचं मॉडल आम्ही बाहेर नेणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. शिवसेना गोव्याला नवीन नाहीये. शिवसेना स्थानिक भूमिपूत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. ही निवडणूक पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही. ही निवडणूक गोंयकरांबद्दलची आहे. गेली दहा वर्ष भाजपची राज्यात सत्ता आणि केंद्रात सात वर्ष सत्ता आहे. तरीही गोव्याचा शाश्वत विकास का झाला नाही? दुर्गम भागात पाणी प्रश्न असता तर समजू शकलो असतो पण मुख्य गोव्यात पाण्याचा प्रश्न आहे. मग कुणाचा विकास झाला? जनतेचा विकास झाला की काही पक्षाचा विकास झाला? हा प्रश्न राहतोच, असा सवालही त्यांनी केला.
आम्ही कोणत्या स्पेसिफिक वोटिंगसाठी आलो नाही. जात धर्माची मते घ्यायला आलो नाही. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहोत. जी मैत्री जपली ती खुलेपणाने जपली. जे जपायचं आहे ते स्वच्छपणे केलं आहे. उत्पल पर्रिकरांना साफ आणि स्वच्छ मनाने पाठिंबा दिला आहे. त्यासाठी छुप्या बैठका झाल्या नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Pramod Sawant यांच्या साखळी मतदारसंघात Aaditya Thackeray घेणार जाहीर सभा