अहमदाबाद: भारतीय ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा लाखो लोकांच मन जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने रिवाबाला जामनगर उत्तरमधून उमेदवारी दिली होती. रिवाबा या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.
पूर्ण ताकत झोकून दिली
रिवाबाच्या या विजयात रवींद्र जाडेजाचही तितकच योगदान आहे. त्याने सुद्धा पत्नीच्या विजयासाठी दिवस-रात्र प्रचार केला. रवींद्र जाडेजा सध्या दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. त्याने आपली पूर्ण ताकत पत्नीच्या निवडणुकीत झोकून दिली. त्याचं फळ गुरुवारी मिळालं.
दोघांच्या लव्ह स्टोरीची नेहमी चर्चा
निवडणुकीच्या रणधुमाळीत या जोडप्याच एक वेगळं बॉन्डिंग दिसून आलं. दोघांच्या लव्ह स्टोरीची नेहमी चर्चा होते. या दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. जाडेजा बहिणीच्या मैत्रीणीच्या प्रेमात पडला होता.
तिथूनच दोघांच्या प्रेमकथेला सुरुवात
रिवाबा रवींद्रची बहिण नैनाची मैत्रीण होती. एका पार्टीमध्ये रवींद्र जाडेजा आणि रिवाबाची भेट झाली. या भेटीनंतर दोघांनी परस्परांना एकमेकांचे नंबर दिले. तिथूनच दोघांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली.
म्हणून पोलिसात त्याच्याविरोधात तक्रार
पहिल्या भेटीनंतर दोन महिन्यात दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर एप्रिल 2016 मध्ये लग्न केले. जाडेजाच्या लग्नात गोळ्या चालवून सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. म्हणून पोलिसात त्याच्याविरोधात तक्रारही दाखल झाली होती.
रिवाबा मोठ्या मताधिक्क्याने विजयी
जामनगर उत्तरमधून रवींद्र जाडेजाची बायको रिवाबा जाडेजा विजयी झाली आहे. तिला 55,341 मतं मिळाली. त्यांनी आप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 24,008 मते मिळाली. रिवाबाने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. जामनगर उत्तरमध्ये काँग्रेस, आप आणि भाजपा असा तिहेरी सामना होता. काँग्रेसने इथून बिपेंद्रसिंह जडेजा यांना तिकीट दिलं होतं.