मोदी 3.0 : मोदींच्या शपथविधीसाठी दिग्गजांना निमंत्रण, श्रीलंकेपासून ते बांग्लादेशपर्यंत… ‘या’ राष्ट्रांचे प्रमुख लावणार हजेरी
PM Modi Swearing-in Ceremony : नरेंद्र मोदी 8 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी समारंभासाठी बांग्लादेश, श्रीलंका, भूटान, नेपाल आणि मॉरीशसच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात एनडीएच सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींची ही हॅटट्रिक असून हा शपथविधी भव्य व्हावा यासाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, चित्रपटसृष्टीतील स्टार्स, मोठमोठ उद्योगपती यांच्यासह शेजारील राष्ट्रांचे प्रमुख नेते आणि जगातीलही प्रमुख नेत्यांना निमंत्रण धाडण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या या शपथविधी समारंफभासाठी बांग्लादेश, श्रीलंका, भूटान, नेपाल आणि मॉरीशस या राष्ट्रांचे पंतप्रधान / राष्ट्रपती यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे, असे राष्ट्रपती कार्यालयाच्या मीडिया विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कोणाकोणाला देण्यात आलं निमंत्रण ?
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी यापूर्वी कोणाला दिलं होतं निमंत्रण ?
2014 साली नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. या पहिल्या शपथविधीसाठी सार्कच्या (SAARC) नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सार्कमध्ये भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सदस्य देश आहेत.
तर 2019 साली सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यावर झालेल्या मोदींच्या शपथविधी समारंभासाठी BIMSTEC म्हणजेच Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation या देशांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. BIMSTEC सदस्यांमध्ये बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ आणि श्रीलंका यांसह अनेक देशांचा समावेश आहे.
कधी होणार मोदींचा शपथविधी ?
हाती आलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी हे येत्या 8 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. 2014 आणि 2019 साली भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले होते. मात्र यावेळी पहिल्यांदाच भाजपला बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही, मात्र भाजपप्रणित एनडीए बहुमताची 272 ही मॅजिक फिगर पार केली आहे. त्यामुळे देशात एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे.
दरम्यान शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाने काही पावल उचलली आहेत. 9 जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहे. शपथविधी झाल्यानंतरच राष्ट्रपती भवन खुले केले जाणार आहे.