Explainer : महाराष्ट्रात फारशा जागा न मिळविताही कसे ताकदवान बनले एकनाथ शिंदे
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा ही चर्चा होऊ लागली आहे. ती अशी उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची शिवसेना असली... परंतू, यंदाच्या लोकसभा 2024 चे निकाल पाहता उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात भूकंप घडवून शिवसेना ( Shivsena ) फोडल्यानंतर एकनाथ शिंदे देशभरात स्टार झाले. देशभरातील चर्चित व्यक्तीमत्व बनलेले एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या समावेशाने एनडीएला निदान महाराष्ट्रात तरी लोकसभा निवडणूकांत फारसा चमत्कार करता आलेला नाही. दुसरीकडे या अपयशाची जबाबदारी म्हणून महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करा अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणूकांत केवळ सात खासदार आणून देखील एकनाथ शिंदे हेच भाजपाच्या मिशन विधानसभेचे तुरुपाचे एक्के बनलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा ठाणे-कल्याण गड कायम राखल्याने तसेच कोकण, रायगड आणि संभाजीनगरातील विजय शिंदे सेनेचे टॉनिक ठरले आहे.
एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचे फारसे नुकसान झालेले नाही. परंतू शिवसेना उद्धव ठाकरे गटाने लढविलेल्या जागा आणि त्यांना जिंकलेल्या जागा अतिशय कमी आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 9 जागा जिंकल्या. तर शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या. तरीही शिंदे यांचे स्थान भाजपाच्या मंचावर मोठे झाले आहे. कारण महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची भाजपाला अत्यंत गरज आहे. त्यामुळे जागा घटूनही एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद कायम रहाणार आहे.
एकनाथ शिंदे गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नवा तारा म्हणून ताकदवान बनले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा जातीला असलेले महत्व पाहून त्यांच्या कलानेच भाजपाने राजकीय पाऊल उचलले आहे. मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन असो की शिवसेनेचे खच्चीकरण त्यांना समोर ठेवूनच सर्व चाली भाजपाची चाणक्य मंडळी दिल्लीतून रचत आहेत. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ते एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविण्यापर्यंत भाजपाने अशा चाली केल्या की कट्टर शिवसैनिकांत संभ्रम निर्माण होऊन एकही प्रतिक्रीया उमटलेली नाही. आता लोकसभा निवडणूकांचे निकाल ( Lok Sabha Election Result 2024 ) आल्यानंतरही त्यांचे भाजपातील स्थान घटलेले नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते त्यांची ताकद वाढतच चालली आहे.
शिवसेनेतील फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Elections 2024 ) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी प्रतिष्ठेची लढाई झाली होती. देशभरात शिवसेनेशी संबंधित बातम्या चर्चेत राहील्या आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर लोकसभा निवडणूक ही दोघांची टक्कर होण्याची पहिलीच वेळ होती. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे गट परस्परांना या निमित्ताने भिडले. लोकसभा निवडणूकांच्या निकालांनी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. तरी असली शिवसेना कोणती याचे उत्तर अजूनही शिल्लक आहे. कारण, उद्धव ठाकरे यांनी जादा जागा लढून कमी जागा मिळविल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांना भाजपाकडून उशीरा परवानगी मिळूनही 7 लोकसभा जिंकल्या आहेत. त्यामुळे हा विजय दोन्ही पक्षांना समान मिळाला आहे. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना असली की ठाकरे यांची शिवसेना असली याचा फैसला आता विधानसभा निवडणूकांमध्ये होणार आहे.
शिंदे यांचा स्ट्राईक रेट चांगला
15 लोकसभा जागांवर निवडणूका लढूनही 7 जागांवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना जिंकली आहे. यात शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचाही समावेश आहे. परंतू त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धक उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या लढाईत मुंबईतील दोन लोकसभा जागांना शिंदे यांना गमवावे लागले आहे. दक्षिण मुंबईत ठाकरे यांच्या अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला आहे. तर दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघात शिंदे यांच्या राहुल शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे यांचे अनिल देसाई निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 21 जागांवर निवडणूक लढवित 9 जागांवर विजय मिळविला आहे.
शिवसेना असो की एनसीपी पक्षांतून फूटून तयार झालेल्या दुसऱ्या गटांनी लोकसभेच्या जागा गमविल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 9 जागा जिंकल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी केवळ 7 जागा जिंकल्या आहे. शिंदे यांना शिवसेना ( उद्धव ) यांच्याशी सरळ झालेल्या युद्धात मुंबईतील दोन जागांवर फटका बसला आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकांत चांगली कामगिरी केली आहे, राष्ट्रवादीने कमी जागा लढवूनही 8 जागा जिंकल्या आहेत. तर त्यांचा पक्ष फोडणारे त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाने पक्षाचा झेंडा आणि पक्षाचे चिन्ह देऊनही केवळ एकच जागा जिंकता आली आहे.
भाजपाला लोकसभा 2024 मध्ये स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. तरीही भाजपाप्रणित एनडीए सहकारी पक्षांच्या मदतीने सरकार बनविण्यासाठी आवश्यक बहुमत सहज मिळविले आहे. त्यामुळे आता एनडीएला आता प्रत्येक घटक पक्ष महत्वाचा ठरला आहे. एखादा मोठा पक्ष जर एनडीए सोडून गेला तर सरकार अल्पमतात येईल अशी स्थिती तयार झाली आहे. अशात एकनाथ शिंदे लोकसभा निवडणूकांत थोडे कमजोर पडूनही सध्याच्या राजकीय परिस्थिती मजबूत झाले आहे.
13 लोकसभा जागांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांची थेट लढत
शिवसेना एकनाथ शिंदे गटाची 15 लोकसभा मतदार संघापैकी 13 लोकसभा मतदार संघात त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गटाशी थेट लढाई होती. त्यापैकी सहा सीट वर त्यांना विजय मिळाला आहे. या सहा जागांमध्ये ठाणे, कल्याण, हातकणंगले, बुलढाणा, औरंगाबाद आणि मावळ अशा आहेत. मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा पराभव झाला आहे. परंतू मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात त्यांच्या उमेदवाराने केवळ 48 मतांनी ही जागा राखली आहे. मुंबईत साल 1966 मध्ये शिवसेनेचा जन्म मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायातून झाला होता.
2019 च्या आधी लोकसभा निवडणूकांमध्ये तत्कालीन अविभक्त शिवसेनेने भाजपाच्या सोबत युतीकरुन 23 लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविली होती आणि 18 लोकसभा जागांवर विजय मिळविला होता. वास्तविक दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 15 लोकसभा जागांवर निवडणूक लढली होती.
एकनाथ शिंदे यांनी दिली पराभवाची कारणे
एकनाथ शिंदे यांनी एनडीएने घटना बदलण्यासंदर्भातील विरोधकांचा दुष्प्रचार आणि आपले उमेदवार घोषीत करण्यात आलेल्या उशीरामुळे शिवसेना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नुकसान झाल्याचा दावा केला आहे. विरोधकांची व्होट बँकेची राजकारणाने एनडीएच्या प्रचाराला बाधा पोहचली आणि चुकीचा संदेश जनतेत गेला. विरोधकांनी लागोपाठ घटना बदलणार असा खोटा प्रचार केला. आणि आम्ही मतदारांचा गैरसमज दूर करण्यात अपयशी ठरलो. आणि व्होटबँकच्या राजकारणाने आम्हाला मोठे नुकसान झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
विधानसभेत ‘असली शिवसेना’ कोणाची कळणार
एकनाथ शिंदे यांची पुढील कसोटी आता या वर्षअखेर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणूकांमध्ये होणार आहे. हीच निवडणूक असली शिवसेना कोणाची आहे याचा फैसला करणार आहे. याच निवडणूकांत साल 2022 मध्ये दोन गटात विभागलेल्या शिवसेनेपैकी असली शिवसेना कोणाची याचा निकाल होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर पक्षाचे अधिकृत नाव आणि निवडणूक चिन्हं उद्धव ठाकरे यांच्याकडून हिसकावण्यात आले. शिवाजी पार्क समोर उभे असलेले ‘शिवसेना भवन’ अजूनही उद्धव ठाकरे यांच्याजवळ आहे. गेल्या अनेक दशकांपासून हे शिवसेनेचे मुख्यालय आहे. बाळा साहेबांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी करीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक केल्याने आपण शिवसेना सोडल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. परंतू स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारधारेशी होत असलेली प्रतारणा सहन न झाल्याने आपल्या बंडखोरी करावी लागली. बाळासाहेबांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामान्य शिवसैनिकांना मित्रासारखे वागवायचे. परंतू उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना घरगडी समजायचे असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडत भाजपाच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सत्तापालट केला होता.
कोण आहेत एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ताकदवान नेता बनले आहेत. कधी ऑटो रिक्षा चालविणारे एकनाथ शिंदे यांनी 1997 मध्ये नगरसेवकपासून राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये ते सातत्याने चार वेळा महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले. 2014 मध्ये त्यांची शिवसेना विधीमंडळ नेते पदी नियुक्ती झाली. तसेच त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पद सुद्धा भूषविले होते.
2019 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. परंतू त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही. त्यांना एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील सर्वात जवळील व्यक्ती म्हटले जात होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर अडीच – अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचे वचन मोडल्याने युती तोडून टाकली. ठाकरे यांनी शरद पवार आणि कॉंग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. हे सरकार कोरोना काळात दोन-अडीच वर्षे चालले. त्यावेळी पवार यांच्या सल्ल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्यावर महत्वाची सर्जरी झाली असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना फोडून पुन्हा युतीचे सरकार स्थापन झाले. भाजपाने एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले.