राज्यातील ‘या’ नेत्यांना मंत्रीपदाची लॉटरी?, खान्देशातही मंत्रीपद?; कोणत्या पक्षातून कुणाची नावे चर्चेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत. मोदी यांच्यासोबत 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. एनडीएतील घटक पक्षांना या मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7.15 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मोदींसोबत एकूण 18 मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला सर्वाधिक मंत्रीपदे मिळणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रालाही महत्त्वाची मंत्रीपदे दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावेही चर्चेत आहेत.
केंद्रीय मंत्रीपदासाठी भाजपकडून राज्यातील चार खासदारांची नावे चर्चेत आहे. नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. खान्देशातून रक्षा खडसे यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडसे मंत्री होतात का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
शिंदे गटाकडून चार नावे चर्चेत
शिंदे गटाला दोन मंत्रीपदे दिली जाणार आहेत. एक कॅबिनेट आणि दुसरं राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आणि धैर्यशील माने यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. शिंदे गटातील ते सर्वात सीनिअर खासदार असल्याने त्यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. शिंदे गटाच्या खासदारांचीही तशी मागणी आहे. पण आदित्य ठाकरेंबाबत उद्धव ठकारेंवर जी टीका झाली, तीच टीका आपल्यावरही होऊ शकते याची भीती असल्याने एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर श्रीकांत शिंदे यांनीही पक्षातील सीनिअर खासदाराला मंत्रीपद द्या, अशी मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अजितदादा गटात चुरस
अजितदादा गटालाही एक मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव चर्चेत आहे. एक मंत्रीपद आणि दोन नेते अशी चुरस अजितदादा गटात आहे. त्यामुळे अजितदादा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅबिनेट मंत्रीपद मिळालं तर पटेल मंत्री होतील, तर राज्यमंत्रीपद मिळालं तर तटकरे मंत्री होतील, असंही सांगितलं जात आहे.
आठवलेंचं प्रमोशन होणार?
दरम्यान, रामदास आठवले यांच्या पक्षाने महायुतीत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. एकही सीट न घेता आठवले यांनी देशभर भाजपचा प्रचार केला होता. त्यामुळे आठवलेंनाही मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी आठवले यांना कॅबिनेटपदी बढती देण्याबाबतचं आश्वासन निवडणुकीत दिलं होतं. त्यामुळे यावेळी आठवलेंचं प्रमोशन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. चार महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्याने आठवलेंना ही जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.