पडद्यावरील खलनायक झाला 7 लाख कुटुंबाचा नायक, निवडणुकीत पराभव झाला तरीही…
ही केवळ मते नाहीत तर 7 लाख कुटुंबांचा आपल्यावर विश्वास आहे. मला त्यापेक्षा जास्त काही मिळाले नाही. उलट या कुटुंबांनी मला दत्तक घेतले आहे. गुडगाव लोकसभेत जेवढी मते मिळाली तेवढी मते इतर कोठेही मिळाली नाहीत.
बॉलीवूड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये कधी नायक तर कधी खलनायक भूमिका करणारे अभिनेता राज बब्बर यांनी राजकारणात प्रवेश केला. 1989 मध्ये व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील जनता दलात प्रवेश करून राजकारणात प्रवेश केला. तीन वेळा लोकसभेचे तर दोन वेळा राज्यसभेचे सदस्य असणारे राज बब्बर यांनी 2008 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या राजकुमार चहर यांनी त्यांचा 4,95,065 मतांनी पराभव केला. 2024 ची निवडणुक राज बब्बर यांनी गुरुग्राम लोकसभा मतदारसंघातून लढविली. यावेळीही ते पराभूत झाले. मात्र, पराभवानंतर प्रतिक्रिया देताना राज बब्बर भावूक झाले होते. आम्ही इथल्या जनतेला घेऊन सुरू केलेल्या हक्काच्या लढ्यात आम्ही नक्कीच जिंकू, असे ते म्हणाले.
हरियाणा राज्यातील गुडगाव लोकसभा मतदारसंघामधील लढत रंजक झाली होती. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंग यांच्याविरोधात काँग्रेसचे राज बब्बर अशी प्रमुख लढत होती. तर, जेजेपीने बॉलीवूड गायक फाजिलपुरिया राहुल यादव यांना तिकीट देऊन ही लढत रोमांचक केली होती. त्याशिवाय पावभाजी विक्रेते कुशेश्वर भगत यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे ही लढत विशेच चर्चेत होती. या लढाईत भाजपचे राव इंद्रजित सिंग यांनी राज बब्बर यांचा 75 हजार 79 मतांनी पराभव केला.
काँग्रेस उमेदवार राज बब्बर यांचा पराभव झाला असला तरी त्यांना 7 लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. मतांचा हा आकडा पाहून राज बब्बर भावूक झाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही केवळ मते नाहीत तर 7 लाख कुटुंबांचा आपल्यावर विश्वास आहे. मला त्यापेक्षा जास्त काही मिळाले नाही. उलट या कुटुंबांनी मला दत्तक घेतले आहे. गुडगाव लोकसभेत जेवढी मते मिळाली तेवढी मते इतर कोठेही मिळाली नाहीत. मी गुडगावला स्थायिक होण्यासाठी आलो आहे असे ते म्हणाले.
निवडणूक प्रचारादरम्यान काही लोकांनी मला बाहेरचा माणूस म्हटले. पण, मी बाहेरचा नाही. मी गुडगावला स्थायिक होण्यासाठी आलो आहे. गुडगावमध्ये 18 दिवस प्रचार केला. दररोज 50 हजार कुटुंबांना भेटलो. हे सर्व माझे स्वतःचे कुटुंब आहे. अजून काही शेजारी भेटायचे बाकी होते त्यांना मी आता भेटेन. गुडगावमध्ये राहून येथील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. लोकांचा भाजपवरील विश्वास उडाला आहे असे राज बब्बर म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंकज दावर म्हणाले की, याला आम्ही पराभव म्हणणार नाही. गुडगाव लोकसभेत काँग्रेसला 46 टक्के मते मिळाली आहेत. यावरून परिवर्तनाचे वादळ फुंकल्याचे स्पष्ट झाले आहे. हरियाणात काँग्रेसने पाच जागा जिंकल्या आहेत, हे कौतुकास्पद आहे. दीपेंद्र हुडा यांचा रोहतकमधील विजय ऐतिहासिक आहे. त्याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. लोकांचा भाजपवरील विश्वास उडाला आहे. मोदी फॅक्टरही शून्य झाला आहे. मोदी लाटेचा तडाखाही जनतेवर पडला आहे. आता जनता मोदींच्या नावावर नाही तर विकासाच्या नावावर काँग्रेसला मत देईल असे त्यांनी सांगितले.