शरद पवार यांचा नवा पॉवर प्ले, इंडिया आघाडी सोडून गेलेल्या नेत्यांला थेट उप पंतप्रधान पदाची ऑफर?
राज्यात पक्षाला अपेक्षित यश मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले शरद पवार यांनी आता देशातही पुन्हा चमत्कार घडविण्याच्या तयारीत आहेत. इंडिया आघाडी सोडून गेलेल्या एका बड्या नेत्याला शरद पवार यांनी फोन करून थेट उप पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे.\
देशात लोकसभा निवडणुकांचे कल हाती येत आहेत. त्यानुसार भाजपची ‘अब की बार, 400 पार’ ची घोषणा हवेत विरल्याचे वातावरण दिसून येत आहे. भाजपप्रणीत एनडीएला 300 जागा गाठणेही कठीण झाले आहे. तर, इंडिया आघाडीला 240 पेक्षा अधिक जागा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. अशातच महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपला पॉवर प्ले दाखविण्यास सुरवात केली आहे. अजित पवार यांनी बंड करून पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतले. पण, शरद पवार यांनी न डगमगता पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढला आणि लोकसभा निवडणुकीत आपला करिष्मा दाखविला. राज्यात पक्षाला अपेक्षित यश मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले शरद पवार यांनी आता देशातही पुन्हा चमत्कार घडविण्याच्या तयारीत आहेत. इंडिया आघाडी सोडून गेलेल्या एका बड्या नेत्याला शरद पवार यांनी फोन करून थेट उप पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कॉंग्रसने काही पक्षांना सोबत घेत इंडिया आघाडी स्थापन केली. त्यात महाराष्ट्रातील शरद पवार आणि उद्धव ठाकरे या बड्या नेत्यांचा समावेश होता. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, तामिळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र यासारख्या पक्षासोबत आघाडी केली होती. मात्र, ही आघाडी झाल्यानंतर जागा वाटपावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा अचानक निर्णय घेतला.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान इंडिया आघाडीला बहुमतासाठी काही थोड्या जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना फोन केला आहे. इंडिया आघाडीच्या बाजूने त्यांनी परत यावे यासाठी हा फोन असल्याचे समजते. त्याचवेळी इंडिया आघाडीचे सरकार आल्यास उप पंतप्रधान पद देण्याचीही ऑफर पवार यांनी नितीशकुमार यांना दिली असल्याचे समजते.
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर समन्वय म्हणून जबाबदारी दिली आहे. शरद पवार हे देशातील जुने जाणते नेते आहेत. त्यांचा शब्द कुणी मोडणार नाही याची खात्री असल्यामुळेच त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनीही चंद्राबाबू नायडू यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान. या सर्व घडामोडी पहाता पुन्हा भाजप सरकार सत्तेत येणार की इंडिया आघाडीचे सरकार येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.