Lok Sabha Election 2024 : भाजपचे टेन्शन वाढले, युपी आणि महाराष्ट्राचे आकडे धक्कादायक? हाच कल कायम राहिला तर…
म्हणजे ज्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात भाजपची भिस्त होती त्याच उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात भाजप पिछाडीवर गेली आहे. युपीमध्ये अखिलेश यादव यांचा तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा करिष्मा पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरवात झाली. या मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर धक्कादायक निकाल हाती येत आहेत. एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजानुसार देशात एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मतमोजणीच्या सुरवातीला 300 हून अधिक जागांवर आघाडीवर असणारा भाजप पहिला फेरीअखेर काहीसा मागे पडला. तर, इंडिया आघाडीला त्या तुलनेत अधिक जागा मिळतील असा कल समोर येत आहे. आतापर्यंच्या मतमोजणीमधून भाजपला 290 तर इंडिया आघाडीला 215 जागा मिळण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे ज्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात भाजपची भिस्त होती त्याच उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात भाजप पिछाडीवर गेली आहे. युपीमध्ये अखिलेश यादव यांचा तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा करिष्मा पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एकूण 80 लोकसभेच्या जागा आहेत. यात एनडीए आघाडीचे भाजप 75 जागा लढवीत आहे. तर, मित्रपक्ष अपना दल 2, राष्ट्रींय लोक दल 2 आणि सुहेलदेव 1 अशा मिळून 5 जागा लढवीत आहे. तर, इंडिया आघाडीचे घटकपक्ष काँग्रेस 17, समाजवादी पार्टी 62 तर तृणमुल काँग्रेस 1 जागा लढवीत आहे. हाती आलेल्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष 40 जागांवर आघाडीवर आहे. भाजपला 30 जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची सायकल जोराने पळताना दिसत आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुतीनंतरही करिष्मा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात भाजपाला 16 आणि शिंदे गट 6 जागांवर आघाडीवर आहे. अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळताना दिसत नाही. तर, महाविकास आघाडीतील घटकपक्ष कॉंग्रेसला 7, शरद पवार यांची राष्ट्रवादी 8 आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना 9 जागांवर आघाडीवर आहेत.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांकडे देशाच्या सत्तेच्या चाव्या हाती आहेत. त्यामुळेच या दोन्ही राज्यांवर भाजपने आपले लक्ष केंद्रित केल होते. मात्र, याच दोन प्रमुख राज्यात भाजप पिछाडीवर जाताना दिसत आहे.