तर… शिंदे, अजितदादा यांनी अधिक जागा जिंकल्या असत्या, कुठे घडलं, कुठे बिघडलं?
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सर्वेक्षण केले होते. त्यानुसार शिंदे गटाला 8 जागा देण्यात येणार होत्या. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वजन वापरून 15 जागा मिळविल्या. परंतु, या जागा देताना भाजपने पुन्हा सर्वेक्षणाच्या नावाखाली उमेदवार बदलले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यामानाने महाविकास आघाडीचे जास्त खासदार निवडून आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बिघडले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील या निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सर्वेक्षण केले होते. त्यानुसार शिंदे गटाला 8 जागा देण्यात येणार होत्या. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वजन वापरून 15 जागा मिळविल्या. परंतु, या जागा देताना भाजपने पुन्हा सर्वेक्षणाच्या नावाखाली उमेदवार बदलले. त्यामुळेच शिंदे गटाचे आणि पर्यायाने महायुतीचे नुकसान झाले अशी माहिती शिंदे गटातील सूत्रांनी दिली.
भाजपने विविध प्रकारच्या सर्वेक्षणांच्या नावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) उमेदवारांच्या जागा बदलल्याचा दावा या सूत्रांनी केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कोणत्याही सर्वेक्षणाच्या दबावाला बळी न पडता आपलेच उमेदवार उभे करण्याची चर्चा महायुतीमध्ये सुरू झाली आहे.
लोकसभा उमेदवारांची अदलाबदल का झाली?
विदर्भातील रामटेक मतदारसंघातून शिवसेनेला कृपाल तुमणे यांना तिकीट द्यायचे होते. मात्र, तिथे राजू पारवे यांना तिकीट देण्यात आले. पारवे यांचा काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी 76 हजार 768 मतांनी पराभव केला.
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातही भावना गवळी यांना तिकीट न देता त्यांच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट दिले. राजश्री पाटील यांचाही ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांनी 94 हजार 473 मतांनी पराभव केला.
हिंगोलीमधून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा द्यायला हवे होते. मात्र, इथेही बाबुराव कोहलीकर यांना तिकीट दिले गेले. या निवडणुकीत कोहलीकर यांचा ठाकरे गटाचे उमेदवार नागेश आष्टीकर यांनी पराभव केला. विशेष म्हणजे हिंगोलीमधून हेमंत पाटील यांच्या नावाची घोषणा शिंदे गटाने आधी केली होती. पण, ऐनवेळी कोहलीकर यांचे नाव पुढे आले.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तिकीट देण्याची चर्चा होती. मात्र, शिंदे गटाने ही जागा प्रतिष्ठेची केली. पुन्हा हेमंत गोडसे यांना तिकीट दिले गेले आणि शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा 1 लाख 62 हजार मतांनी पराभव केला.
एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) देखील उमेदवारांची जागा सर्वेक्षणाच्या नावाखाली बदलण्यात आली. त्यामुळे अजितदादा गटाच्या कमी जागा निवडून आल्या. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषदेतील आमदार विक्रम काळे यांना तिकीट दिली असती तर विजयची अधिक शक्यता होती. पण, अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उद्धव गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा सहज विजय झाला.
परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांना तिकीट हवे होते. मात्र, त्यांच्याऐवजी एनडीएचे घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना तिकीट दिले गेले. मात्र, संजय (बंडू) जाधव यांच्याकडून ते पराभूत झाले. गडचिरोली-चिमूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे नेते बाबा आत्राम यांची चांगली पकड आहे. मात्र, त्यांच्याऐवजी भाजपचे अशोक नेते यांना तिकीट दिले गेले. त्यांचा काँग्रेस नेते डॉ. किरसान नामदेव यांनी पराभव केला.