ठाकरे, पवारांनी ताकद दाखवली…, या बड्या नेत्यांमुळेच भाजपचा खेळ का बिघडला?
2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात 25 जागा लढवून 23 जागा जिंकणारा भाजप आता 12 जागांवरच मर्यादित होताना दिसत आहे. भाजपचा खेळ बिघडविण्यामागे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन बडे नेते कारणीभूत आहेत का? ही आहेत त्याची पाच मोठी कारणे
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे नाट्य पाहायला मिळाले. अजित पवार यांनी काकांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस तोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तर, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना तोडली. भाजपच्या साथीने त्यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. तर, भाजपनेही विधानसभेत जास्त संख्याबळ असूनही मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना देऊन मनाचा मोठेपणा दाखविला. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजप, शिंदे आणि अजितदादा यांनी एकत्रित निवडणूक लढविली. पण, भाजपचा हा निर्णय स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार ठरला. एकहाती सत्ता असूनही महाराष्ट्रात एनडीएला अपयश का मिळाले याची काही महत्वाची कारणे आहेत.
शिंदे यांच्या बंडखोरीची लोकांमध्ये असलेली नाराजी
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यावेळी खरी शिवसेना कोणती असा प्रश्न निर्माण झाला. शिंदे यांच्या विश्वासार्हतेवर ठाकरे गटातील नेत्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले. शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली. मुख्यमंत्रीपद मिळवले. पण, जनतेचा विश्वास त्यांना जिंकता आला नाही. या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून महाराष्ट्रातील जनतेने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवारांवर महाराष्ट्राचा विश्वास नाही
महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यातील लढत कुणापासून लपून राहिलेली नाही. पुतणे अजित पवार यांनी शरद पवारांविरुद्ध एकदा नव्हे तर दोनदा बंड केले. सकाळच्या शपथविधीच्यावेळी झालेली चूक काकांनी सुधारून पुतण्याला माफ केले. पण, दुसऱ्यावेळी पुन्हा तीच चूक अजितदादा यांनी केली. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत फारकत घेऊन काकांचा विश्वासघात करणाऱ्या अजित पवारांना या निवडणुकीच्या माध्यमातून करून महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवला आहे. अजित दादा यांच्यापेक्षा शरद पवार यांच्यावरच आपला विश्वास असल्याचे महाराष्ट्राच्या या निकालात स्पष्ट केले आहे.
शरद पवारांनी ताकद दाखवली…
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा योद्धा, चाणक्य म्हणून शरद पवार ओळखल्या जातात. आपल्याशी पंगा घेणे सोपे नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. साम, दाम, दंड भेद वापरून कुणाचाही पराभव करू शकतो हे त्यांनी अनेक प्रसंगी दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण पवारांभोवतीच फिरत असल्याची आठवण त्यांनी या निमित्ताने भाजपला करून दिली. भाजपच्या या पराभवात शरद पवार यांचाही मोठा वाटा आहे.
उद्धव ठाकरेंबद्दल महाराष्ट्राला सहानुभूती
शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी बहुतांश आमदार खासदार यांना आपल्या छावणीत आणले. त्यावेळी खरी शिवसेना कोणती असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाने शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असो वा उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष फोडणारे अनुक्रमे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना जनतेने नाकारले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरची ही महाराष्ट्रातील पहिलीच मोठी निवडणूक झाली. मात्र, जनतेची सहानुभूती ही स्पष्टपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडेच असल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे.
भाजपला काँग्रेसची ताकद समजली नाही
भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले. परिणामी महाराष्ट्रात काँग्रेस हळूहळू मजबूत होत गेली. कॉंग्रेसमधील काही नेते जरी वेगळे झाले. इतर पक्षांमध्ये सामील झाले. तरी त्याचा फार मोठा परिणाम या निवडणुकीवर झाला नाही. नांदेडमध्ये अशोच चव्हाण यांनी कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. राज्यसभेवर खासदार झाले. पण, त्याच नांदेडमध्ये कॉंग्रेस खासदारांचा विजय झाला. काँग्रेसला कमी लेखणे ही भाजपची सर्वात मोठी चूक ठरली.