पंकजा मुंडे पडणार, रावसाहेब दानवेंचा बदला परमेश्वर घेणार; चंद्रकांत खैरे यांचे मोठमोठे दावे
लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या मंगळवारी लागणार आहे. कोणता पक्ष सत्तेवर बसणार याचं चित्र मंगळवारी दुपारपर्यंत स्पष्ट होईल. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. काही उमेदवारांनी तर आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे पाच दिवस बाकी असताना दावे प्रतिदावे करणं सुरू झालं आहे. प्रत्येक उमेदवार मीच जिंकून येणार असा दावा करत आहे. तसेच आपल्याच अलायन्सला अधिक जागा मिळतील असाही दावा करत आहे. पण ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे पडणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरे यांच्या या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे.
महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपले आहेत. मराठवाड्यात महायुतीला एकही जागा मिळणार नाही. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे पडणार आहेत. परमेश्वर रावसाहेब दानवे यांचा बदला घेणार आहे, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
ओव्हर कॉन्फिडन्स नको
निवडणूक निकाल म्हटल्यावर धाकधूक होतेच. शाळेत असताना परीक्षेच्यावेळीही धाकधूक व्हायची. पेपर सोपा गेला की बरं वाटायचं. आताही पेपर सोपा गेला आहे. पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहून चालणार नाही. कारण शेवटी मतदारांच्या हातात कौल आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
दीड लाख मताधिक्य कसं शक्य आहे?
मी एक ते दीड लाखांचं मताधिक्य घेऊन विजयी होणार आहे, असा दावा संदीपान भुमरे यांनी केला आहे. भुमरे यांच्या या दाव्यावरही त्यांनी टीका केली. भुमरेंनी ईव्हीएम मशीन बदलल्या आहेत काय? एक लाखाचं मताधिक्य घेऊन निवडून येणं कसं शक्य आहे? असा सवाल त्यांनी केला. यावेळी हिंदू मते तर मिळणारच आहे. पण 22 टक्के मुस्लिम मतेही मला मिळणार आहे, असा दावा त्यांनी केला.
जलील पडणार
इम्तियाज जलील यावेळी निवडून येणार नाही. मुस्लिम समाज आमच्याकडे आला आहे. त्यामुळे जलील यांचं मतदान घटलं आहे. वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत नव्हती. त्यामुळे वंचितचा फटका जलील यांना बसणार आहे. ते निवडून येणं शक्यच नाही, असा दावाही त्यांनी केला.