लोकसभा निवडणुकीत महायुतीचं पानिपत झालं आहे. महायुतीला सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे. या पराभवाची वेगवेगळी कारणं दिली जात आहेत. विरोधक आपल्या विरोधात नरेटीव्ह सेट करण्यात यशस्वी झाल्यानेच आपला पराभव झाला असं महायुतीकडून सांगितलं जात आहे. तसेच संविधान बदलण्याचा विरोधकांनी प्रचार जोरात केला. त्यामुळेही आपला पराभव झाल्याचं महायुतीचे नेते सांगत आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक प्रचारात मोदींना हा धोका सांगितला होता, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन होता. या सोहळ्याला संबोधित करताना प्रफुल्ल पटेल यांनी हा दावा केला आहे. आपण काम खूप केलं. यात दूमत नाही. पण एक नरेटिव्ह सेट झाला आहे. केवळ कामाच्या भरवश्यावरच मतदान होईल की नाही हे पाहिलं पाहिजे. संविधान बदलण्याचा प्रचार झाला. त्यामुळे आदिवासी समाजात गैरसमज निर्माण झाला. दलित समाजात गैरसमज होतो हे माहीत होतं. पण आदिवासी समाजात गैरसमज झाला. आदिवासी समाजाला समजावण्यात आपण अपयशी ठरलो. देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत. त्यांच्या सही शिवाय काहीच होऊ शकणार नाही, हे सांगू शकलो नाही. दलित समाजाचे 120च्यावर खासदार आहेत. ते संविधान बदलू देणार नाहीत हे सांगायला आपण कमी पडलो, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारासाठी नागपूरला आले होते. त्यांना संविधान बदलण्याचा अपप्रचार झाल्याचं सांगितलं होतं. नागपूरला दीक्षाभूमी आहे. या ठिकाणी बाबासाहेबांनी क्रांती केलीय. इथूनच तुम्ही संदेश द्या. संविधान बदलण्याचा आपल्याविरोधात जो अपप्रचार सुरू आहे, तो खोडून काढा, असं मोदींना मी सांगितलं. मोदींनी त्यावर भाष्य केलं. पाच सात मिनिटं ते बोलले. पण सोशल मीडियातून मोठा अपप्रचार झाला होता. त्यामुळे बसायचा तो फटका बसला, असं पटेल म्हणाले.
आता निवडणुकीला 120 दिवस राहिले आहेत. म्हणजे चार महिने राहिले आहेत. दिवाळी 31 ऑक्टोबरला आहे. आपल्या सरकारची मुदत 19 नोव्हेंबरपर्यंत आहे. दिवाळीच्या आधी किंवा नंतर विधानसभेसाठी मतदान झालेलं असेल. त्यामुळे आपल्याला 120 दिवसाचा प्रवास करायचा आहे. मध्येच पावसाळा आहे. अधिवेशन आहे. गणपती येतील. नवरात्र आहे. दिवाळी आहे. शेतीचा सीजन आहे. या घडामोडीत आपल्याला निवडणुकीची तयारी करायची आहे. आपण महायुतीत आहोत. आपण महायुती म्हणून सर्वांनी निवडणुकीला समोरे जायचे आहे. परवा भुजबळांनी एक सूचना केली. किती जागा लढवावं हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता तुम्ही 40-50 मतदारसंघावर फोकस करा. त्यात काम करा. उमेदवार तयार करा आणि कामाला लागा, असं आवाहन त्यांनी केलं.