प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात वंचित आघाडीचा महाविकास आघाडीला फारसा फटका बसलेला दिसत नाहीये. मागच्यावेळी वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला 8 जागांवर नुकसान सोसावं लागलं होतं. यावेळीही महाविकासला किमान तीन जागांवर फटका बसला आहे. तर गेल्यावेळीच्या तुलनेत यंदा वंचितला अत्यंत कमी मते मिळाल्याचं दिसून येत आहे. म्हणजेच वंचितला जनतेने साफ नाकारल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
वंचितमुळे महाविकास आघाडीच्या चार जागा पडल्या आहेत. अकोला, बुलढाणा, हाकणंगले आणि वायव्य मुंबईत वंचितमुळे महाविकास आघाडीला फटका बसल्याचं दिसत आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर स्वत: उभे होते. या ठिकाणी तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत आंबेडकर यांना 2,76,747 मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसचे अभय पाटील अवघ्या 40,626 मताने पडले. या ठिकाणी आंबेडकर महाविकास आघाडीकडून उभे असते तर जिंकून आले असते. किंवा आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असता तर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असता.
बुलढाण्यातही ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर पडले. त्यांचा 29 हजार 479 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी वंचितच्या वसंतराव मगर यांनी 98 हजार 441 मते घेतली. ही मते खेडेकर यांच्या पारड्यात गेली असती तर त्यांचा विजय निश्चित झाला असता.
हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील यांचा अवघ्या 13 हजार 426 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी वंचितचे उमेदवार डीसी पाटील उभे होते. डीसी पाटील यांना 32 हजार 696 मते मिळाली. त्याचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला फटका बसला.
वायव्य मुंबईत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात वंचितचे उमेदवार परमेश्वर रणशूर यांनी 10 हजार 52 मते घेतली. त्यामुळे ठाकरे गटाला फटका बसल्याचं दिसून आलं आहे.
कोणत्या उमेदवाराला किती मते
उमेदवाराचे नाव | मतदारसंघ | मते |
---|---|---|
प्रकाश आंबेडकर | अकोला | 276747 |
दिलीप खेडेकर | नगर | 13749 |
अफसर खान | औरंगाबाद | 69266 |
अशोक हिंगे | बीड | 50867 |
संजय केवट | भंडारा-गोंदिया | 24858 |
वसंतराव मगर | बुलढाणा | 98441 |
राजेश बेले | चंद्रपूर | 21980 |
मालती ढोमसे | दिंडोरी | 37103 |
हितेश मडवी | गडचिरोली-चिमूर | 15922 |
डीसी पाटील | हातकणंगले | 32696 |
युवराज जाधव | जळगाव | 21177 |
प्रभाकर बकले | जालना | 37810 |
मोहम्मद शेख | कल्याण | 18741 |
नरसिंगराव उगीरकर | लातूर | 42225 |
रमेश बारस्कर | माढा | 20604 |
माधवीताई जोशी | मावळ | 27768 |
सोनल गोंडाणे | मुंबई उत्तर | 6052 |
संतोष अंबुलगे | मुंबई उत्तर मध्य | 8288 |
दौलत खान | मुंबई उत्तर पूर्व | 14657 |
परमेश्वर रणूशर | वायव्य मुंबई | 10052 |
अफझल दाऊदनी | दक्षिण मुंबई | 5612 |
अबूल खान | मुंबई दक्षिण मध्य | 23867 |
अविनाश भोसीकर | नांदेड | 92512 |
करण गायकर | नाशिक | 47193 |
भाऊसाहेब अंधळकर | उस्मानाबाद | 33402 |
विजया म्हात्रे | पालघर | 10936 |
पंजाब डख | परभणी | 95967 |
वसंत मोरे | पुणे | 32012 |
कौमुदिनी चव्हाण | रायगड | 19618 |
मारुती जोशी | रत्नागिरी-सिंधुदुर्ग | 10039 |
संजय ब्राह्मणे | रावेर | 59120 |
प्रशांत कदम | सातारा2 | 11912 |
उत्कर्षा रुपवते | शिर्डी | 90929 |
डॉ. अन्वर शेख | शिरूर | 17462 |
प्रा. राजेंद्र साळुंखे | वर्धा | 15492 |
वंचित आघाडीने सांगली, कोल्हापूर, बारामती आणि नागपूर या चार मतदारसंघात महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. यापैकी कोल्हापूर, बारामती आणि सांगलीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. तर नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. भिवंडीत त्यांनी अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत सांबरे पराभूत झाले आहेत. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना वंचितने अमरावतीत पाठिंबा दिला होता. तिथे आनंदराज यांचा पराभव झाला आहे. एसजेपीचे यवतमाळ-वाशिमचे उमेदवार डॉ. अनिल राठोड यांनाही वंचितने पाठिंबा दिला होता. राठोड यांचाही पराभव झाला आहे.
या लोकसभा निवडणुकीत वंचितला 14,15,076 मते मिळाली आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला 41,32,446 मते मिळाली होती. म्हणजे या निवडणुकीत वंचितला 27,17,370 मते कमी मिळाली आहेत.