शेख हसीना मोदींच्या शपथविधीला आल्या आणि घेतली सोनियांची गळाभेट ! राहुल-प्रियंकांची देखील केली विचारपूस
बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दिल्लीच्या धावत्या दौऱ्यात कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आणि त्यांच्या दोन्ही मुलांची विचारपूस केली. गांधी परिवाराने देखील त्यांचे मोठ्या जोशात स्वागत केले.
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला सोमवारी ( 10 जून ) आल्या होत्या. त्यांनी नवी दिल्लीत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीवेळी येथे रायबरेली येथून निवडून आलेले खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी देखील उपस्थित होत्या. या भेटीची माहीती कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत एक्स हॅंडलवरुन एक पोस्ट करून दिली आहे. या भेटीवेळी शेख हसीना यांनी सोनिया गांधी यांची गळा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या भावंडांची देखील गळाभेट घेतली.
बांग्लादेश भारताचा मित्र देश आहे. या देशाशी भारताचा व्यापारी संबंध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या मित्र देशांच्या यादीत या आपल्या शेजारी देशाचे स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे मोदी यांच्या शपथविधी समारंभाचे आवर्जून आमंत्रण शेख हसीना यांना देण्यात आले होते. शेख हसीना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला शनिवारी दिल्लीत पोहचल्या. त्यानंतर रविवारी सायंकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रंगलेल्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभात सहभाग घेतला. या सोहळ्याला मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्जू, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि श्रीलंकचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या सह शेजारील देश आणि हिंद महासागर क्षेत्रातील प्रमुख नेते मंडळींनी सहभाग घेतला.
कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत एक्स हॅंडलवरुन केलेली पोस्ट –
CPP Chairperson Smt. Sonia Gandhi ji, former Congress President Shri Rahul Gandhi, and General Secretary Smt. Priyanka Gandhi Vadra ji called on the Prime Minister of Bangladesh Sheikh Hasina Wazed ji this afternoon in New Delhi. pic.twitter.com/gkapnua40Z
— Congress (@INCIndia) June 10, 2024
भारत आणि गांधी कुटुंबियांशी खास स्नेह
शेख हसीना यांचा भारताशी आणि खास करून गांधी कुटुंबांशी खासा स्नेह आहे. एक वेळ अशी आली होती की शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी केवळ तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना केवळ आश्रयच दिला नाही तर त्यांचे प्राण देखील वाचविले होते.
शेख हसीन सहा वर्षे दिल्लीत राहीलेल्या आहेत. साल 1974 पासून ते 1981 या काळात त्यांचा पत्ता दिल्ली, 56 रिंग रोड, लाजपत नगर – 3 हा होता. त्यानंतर दिल्लीतील पंडारा पार्क येथील घरात त्या शिफ्ट झाल्या. त्यावेळी लाजपत नगरात त्या राहायच्या तेथे आता एक कमर्शियल कॉरप्लेक्स तयार करण्यात आले आहे.
साल 1975 बांग्लादेशातील सत्तापालट
शेख हसीना 28 व्या वर्षी भारतात आल्या होत्या. त्यावेळी बांग्लादेशातील सत्तापालट होताना त्यांचे वडील शेख मुजीब उर रहमान आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची लष्कराने हत्या केली होती. या घटनेच्या प्रसंगी शेख हसीना आपल्या पती सोबत जर्मनी येथे होत्या. साल 1975 च्या त्या रात्री बंग बंधू नावाने प्रसिद्ध असलेले शेख मुझीब उर रहमान आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने शेख हसीना आणि त्यांची बहिण रेहाना यांना दिल्लीत आश्रय दिला. आणि त्या सहा वर्षे दिल्लीत राहत होत्या.