4 जूननंतर चक्र उलटं फिरणार… आघाडीचा ‘पंतप्रधान’ कोण?; संजय राऊत यांनी घेतलं ‘या’ नेत्याचं नाव
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्ला केला आहे. कितीही पैशाचं वाटप केलं असलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यांच्या पदरात यश येणार नाही. आम्हीच विजयी होणार आहोत. इंडिया आघाडीचं देशात सरकार येणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पैशाचं अमाप वाटप करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कितीही पैसा वाटला तरी त्यांना राज्यात यश मिळणार नाही, असं सांगतानाच सत्य बोलल्याबद्दल या देशात कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागतं किंवा तुरुंगात तरी पाठवलं जातं. पण 4 जूननंतर चक्र उलटं फिरणार आहे हे लक्षात घ्या. चक्र उलटं फिरणार आहे. आम्हाला चिंता नाही. आम्हाला भीती नाही, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. मी दैनिक सामनात जे लिहितो तो सत्याचा आधार असतो. म्हणून तुम्ही माझ्याशी चर्चा करता. महायुतीत पाडापाडीचा खेळ झाला आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमची लढाई भाजपसोबतच होती. आम्ही भाजपचा पराभव करत आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
कोर्टात जा, गुन्हा दाखल करा
राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. भ्रष्टाचारातून निर्माण झालेलं हे सरकार आहे. त्या सरकारचा बेकायदेशीर मुख्यमंत्री आम्हाला नोटीस पाठवतो. महाराष्ट्रात या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला. मी फोटोसोबत ट्विट केलं आहे. हेलिकॉप्टरमधून पैसे आणले. कोर्टात जा. आमच्याविरोधात गुन्हा दाखल करा. 4 जून नंतर खूप मजा येणार आहे. आम्ही घाबरणारे लोक नाहीत. या देशात खरं बोलणाऱ्यांच्या विरोधात केस दाखल होते. किंवा एफआयआर दाखल केला जातो. किंवा तुरुंगात टाकलं जातं. आता केजरीवाल पुन्हा तुरुंगात जात आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
सेलिब्रिटींची सोय पाहिली
निवडणूक आयोगाला हाताशी पकडून सेलिब्रिटींच्या सोयींसाठी तारखा घेतल्या आहेत. पंतप्रधानांनी शेवटच्या टप्प्यात स्वत:चं मतदान ठेवलं. निवडणूक आयोग जनतेची सोय बघत नाही, तर राजकारणातील सेलिब्रिटींची सोय बघत आहे. हे सत्य आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
राहुल गांधी देशाची चॉईस
इंडिया अलायन्स जिंकत आहे. 4 जून रोजी 12 वाजल्यानंतर तुम्हाला कळेल इंडिया अलायन्सचाच पंतप्रधान होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे त्यांची चॉईस असल्याचं सांगितलं. मीही सांगतो, संपूर्ण देशाची चॉईस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत. आम्ही सर्व राहुल गांधी यांच्या पाठी उभे राहू. राहुल गांधींनी देशात ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, त्याला तोड नाही. देशानं राहुल गांधींना स्वीकारलं आहे. राहुल गांधींचं नेतृत्व जनतेने स्वीकारलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.