पराभव होताच महायुतीत धुसफूस सुरू, मुश्रीफ- घाटगे गटात सोशल मीडिया वॉर सुरू; कोल्हापूरचं राजकारण तापलं
महायुतीचे कोल्हापूरातील उमेदवार संजय मंडलिक यांच्या पराभवानंतर आता हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे गटात सोशल मिडीयात आरोप प्रत्यारोप होत आहेत. विधान सभा निवडणूकांतही आता महायुतीतील घटक पक्षातील बेबनाव उफाळून वर आला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव झाल्यानंतर आता महायुतीतीलच पक्षातील नेत्यांमधला बेबनाव समोर येऊ लागला आहे. या पराभवाचं खापर एकमेकांच्या माथ्यावर फोडण्यासाठी अहमिका सुरू झाली आहे. कागल विधानसभा मतदारसंघात याच मुद्द्यावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजित घाटगे यांच्या समर्थकांमध्ये ‘सोशल वॉर’ सुरू झालं आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपा नेते समरजित घाटगे गटाकडून एकमेकांच्या विरोधात टाकल्या जाणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील बेनाव समोर येताना दिसत आहे. पाहुयात काय घडतंय आणि बिघडतंय कोल्हापूर मध्ये….
लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. या पराभवावरून महायुतीतील घटक पक्षातच राज्यभरामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यास कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ देखील अपवाद ठरलेला नाही. कोल्हापूरात लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात झाली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या मतदारसंघात तळ ठोकून होते. महायुतीच्या इतक्या प्रयत्नांनंतरही महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी संजय मंडलिक यांचा तब्बल दीड लाख मतांनी पराभव केला आहे.
कोल्हापूरातील हा पराभव महायुतीच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर महायुतीतील स्थानिक नेत्यांमध्ये आपसात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विशेषतः कागल विधानसभा मतदारसंघातून संजय मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नसल्याने याचं खापर महायुतीतील घटकपक्ष एकमेकांवर फोडत आहेत. यावरून सध्या कागलमध्ये समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते सोशल मीडियात एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत. दोन्ही गटाकडून टाकल्या जाणाऱ्या पोस्टमुळे सध्या कागलमधील राजकीय वातावरण तापलं आहे. हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्याकडून मात्र या वादाला सुरुवात कोणी केली ? यावरून एकमेकाकडे बोट दाखवलं जात आहे.
एकमेकांचे फोटो व्हायरल
भाजप नेते समरजीत घाडगे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्याप्रचारात सक्रिय असले तरी त्यांचे चुलते प्रवीण सिंह राजे- घाटगे हे मात्र शाहू छत्रपतींचा उघडपणे प्रचार करत होते. शिवाय निवडणुकीदरम्यान शाहू छत्रपती यांचे धाकटे चिरंजीव आणि माजी आमदार मालोजी छत्रपती यांची समरजित घाडगे यांच्याशी एका कार्यक्रमात भेट झाली होती. या भेटीचा फोटो व्हायरल करत मुश्रीफ यांच्या समर्थकांकडून राजे शेवटी राजेंसोबतच गेले… असा प्रचार केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून समरजित घाटगे गटाकडून देखील पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या मैत्रीचे किस्से सांगणारी पोस्ट व्हायरल केली जात आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील कोणी काम केलंय आणि कोणी नाही हे लोकांना माहीत असल्याचं सांगत घाटगे याना डिवचलंय. शिवाय शाहू महाराज हे तीन लाख मतांनी तरी निवडून येतील असं मला वाटलं होतं म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
मुश्रीफ आणि घाटगे गटाच्या संघर्षाचा इतिहास
हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कागल मतदार संघातून गेली सलग पाच वर्ष आमदार म्हणून निवडून येत आहेत. गेली 18 वर्षाहून अधिक काळ त्यांनी वेगवेगळे मंत्री पदं देखील भूषवली आहेत. कागल मतदार संघाबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणातही मुश्रीफ यांचा दबदबा आहे. याच दरम्यान समरजीत घाटगे यांनी 2019 पूर्वी भाजपमध्ये थेट प्रवेश करून पक्षाचे काम सुरू केले. मात्र भाजप शिवसेना युतीमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर जागांची अदलाबदली झाली नाही.
कागल विधानसभा देखील इर्षेने होणार
त्यामुळे समरजीत घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पहिल्यांदाच अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या घाटगे यांनी 90 हजाराहून अधिक मतं मिळवत सर्वांचे लक्ष वेधले होते. 2019 च्या पराभवानंतर पुन्हा कामाला लागलेल्या समरजीत घाटगे यांनी बदल हवा तर आमदार नवा म्हणत आता मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. पराभवावर कोल्हापूरमधील महायुतीच्या नेत्यांनी ‘चिंतन बैठक’ देखील घेतली. मात्र आता या बैठकीनंतर हा बेबनाव उघडपणे समोर येऊ लागला आहे. अर्थात आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आरोप प्रत्यारोप होत असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता कागलची विधानसभा निवडणुक देखील ईर्षेने होणार यात शंका राहिलेली नाही.