मविआ की महायुती? महाराष्ट्रात सर्वाधिक जागा कुणाच्या येणार?; विजय चोरमारेंचा अंदाज काय?
Vijay Chormare on Loksabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालावर भाष्य केलं आहे. विजय चोरमारे काय म्हणाले? त्यांचा अंदाज काय? वाचा सविस्तर..
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन दिवस उरले आहेत. निकालाचा एक्झिट पोल देशासमोर येण्यासाठी अवघे काही तास उरले आहे. आज संध्याकाळी एक्झिट पोल समोर येतील. अशातच राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी देशातील आणि महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालावर भाष्य केलंय. देशात कुणाची सत्ता येणार? महाराष्ट्रात कुणाच्या किती जागा येऊ शकतात. याबाबत विजय चोरमारे यांनी अंदाज व्यक्त केला आहे. निकालानंतर राज्यात अन् देशात काय होणार? यावरही विजय चोरमारे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
एनडीए की इंडिया?
देशात एनडीएला जास्त जागा मिळतील की इंडिया आघाडीला जास्त जागा मिळतील? असा प्रश्न विचारला असता एनडीए की इंडिया आघाडी? याचं उत्तर आताच देणं कठीण आहे. मात्र एनडीएला बहुमत मिळवणं देखील कठीण जाईल. भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही. भाजपने 400 पारचा नारा दिलाय. मात्र त्यांना बहुमताचा आकडाही गाठता येत नाही. 225-230 च्या दरम्यान भाजपला जागा मिळतील. तर भाजपच्या मित्र पक्षांना 25-30 पर्यंत मिळतील. एनडीएला 260 पर्यंतच जागा मिळतील, असं विजय चोरमारे म्हणाले.
महाराष्ट्रातील स्थिती काय?
महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळणार? महाराष्ट्रातील निकाल काय असेल? याकडे सर्वांचं लक्ष आहे. याबाबतही विजय चोरमारे यांनी अंदाज व्यक्त केला. तसंच कुणाला किती जागा मिळतील याचाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील निकाल स्पष्ट आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळतील. याचाच अर्थ महाराष्ट्रातील 25 जागांचा महायुतीला फटका बसणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं पारडं जड आहे. महायुतीला धक्का देणारा हा निकाल असेल, असं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणाले.
निकालानंतर काय होईल?
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण मिळेल. जे पक्ष स्वबळावर लढले आहेत. त्यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यानंतर इंडिया आघाडीतील पक्षांना फोडण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं विजय चोरमारे यांनी सांगितलं.