MODI यांच्या शपथविधी सोहळ्याला इंडिया आघाडी हजर राहणार का ? काय म्हणाले जयराम रमेश…
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ उद्या घेणार आहेत. या सोहळ्यास देश-विदेशातून सात हजाराहून अधिक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडी या सोहळ्याला उपस्थित राहणार का ? या प्रश्नावर कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की....
लोकसभा 2024 चे निकाल लागल्यानंतर आता उद्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार आहेत. एनडीए आघाडीला लोकसभा निवडणूकीत 240 जागा मिळाल्या आहेत. भाजपाला एकट्याच्या बळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. भाजपाप्रणित एनडीए आघाडी सहकारी पक्षाच्या मदतीने सरकार स्थापण करणार आहेत. नरेंद्र मोदी उद्या 9 जून रोजी पंतप्रधान पदाची शपथविधी घेणार आहेत. त्यांच्या सोबत काही सहकारी मंत्र्यांचा देखील शपथविधी होणार आहे. मात्र या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस प्रणित इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार का ? यावर कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी उत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाचे आमंत्रण अजून पर्यंत तरी इंडिया आघाडीच्या नेत्यांना मिळालेले नाही. परंतू असे निमंत्रण आल्यास त्यावर विचार केला जाईल असे कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी शनिवारी मिडीयाशी बोलताना सांगितले. कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश पुढे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, आतापर्यंत आमच्या नेत्यांना आमंत्रण आलेले नाही. जर इंडिया आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण मिळाले त्यावर विचार केला जाईल असे जयराम रमेश यांनी सांगितले.
कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी सांगितले की शपथविधी समारंभात सहभागी होण्यासंदर्भात इंडिया आघाडी निर्णय घेईल. राजस्थानात त्यांचा सहकारी पक्ष राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते हनुमान बेनीवाल यांच्या नाराजी बद्दल बातम्यांचे खंडन करीत त्यांनी सांगितले की मी स्वत: बेनीवाल यांच्याशी बोललो आहे आणि सर्वकाही सुरळीत असल्याचे वेणूगोपाळ यांनी म्हटले आहे.
नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर ?
तत्पूर्वी, काँग्रेस कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेता नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावावर आपण विचार करू असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक बडे नेते या कॉंग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते. जेडीयू नेते के.सी. त्यागी यांनी दावा केला होता की नितीश कुमार यांना इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. जेव्हा काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांना त्यागी यांच्या दाव्याबद्दल विचारले असता त्यांनी आपल्याकडे अशी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.