‘मातोश्री’तूनच मोठ निर्णय?, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक; घडामोडींना वेग
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी विजयी होण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी अत्यंत ताकदीचे उमेदवार दिले जात आहेत. टप्प्याटप्प्याने उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. तसेच जागा वाटपाचा तिढाही सोडवला जात आहे. निवडून येईल हा निकष लावला जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या याद्यांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादीही फायनल केली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील घडामोडींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपावर महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ही चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातच ही चर्चा सुरू असल्याने या चर्चेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मातोश्रीतून आज मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पोहोचले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही मातोश्रीवर गेले आहेत. या तिन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपांवर चर्चा सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. उद्या ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे काँग्रेसने आपल्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळेही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील चर्चेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वादग्रस्त जागांचा तिढा सुटणार
ठाकरे गट आणि शरद पवार गटात काही जागांवरून वाद आहे. हा तिढा आजच्या बैठकीत सोडवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. एखाद दोन जागांची अदलाबदलीही होऊ शकते, असंही सांगितलं जात आहे. तसेच ठाकरे आणि पवार गटांच्या जागा आजच फायनल होऊ शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळेही ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
आंबेडकरांबाबत चर्चा?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती तोडली आहे. तसेच महाविकास आघाडीची चार जागांची ऑफरही नाकारलेली आहे. आपल्याला पडणाऱ्या जागा दिल्या जात आहेत. त्यामुळे या जागा आम्ही घेऊ शकत नाही, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. पवार आणि ठाकरे यांच्यातील बैठकीत या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी त्यांचं मन मिळवायचं की त्यांना वगळून लढायचं यावर या बैठकीत फैसला होऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं.
त्या जागांवर कोण लढणार?
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या चार जागांवर कुणाचे उमेदवार उभे राहणार? या जागा कुणाच्या वाट्याला जाणार? यावरही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठकीत चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.