मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर यांची 48 मतांनी सरशी, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
लोकसभा निवडणूक 2024 ही अत्यंत अतितटीची झाल्याचं पाहायला मिळालं. देशात भाजपाने 400 पारची घोषणा दिली होती. मात्र गाडी 300च्या आतच अडकली. महाराष्ट्रात भाजपा आणि मित्रपक्षांना जबरदस्त फटका बसला. असं असताना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ चर्चेत राहिला. या मतदारसंघातून शिवेसेनेच्या रवींद्र वायकर यांनी बाजी मारली.
लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून रणधुमाळी सुरु होती. एकूण सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपली ताकद उमेदवार विजयी करण्यासाठी लावली होती. काही ठिकाणी यश आलं मात्र काही ठिकाणी अपयशाची चव चाखावी लागली. महाराष्ट्रात शिवसेनेला हव्या तितक्या जागा मिळवता आल्या नाहीत. भाजपाचीही घसरगुंडी झाली. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. असं असताना मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघ चर्चेत राहिला. कारण या ठिकाणी मतमोजणी होत असताना विजयाचं पारडं कधी इकडे तर कधी तिकडे झुकत होतं. ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात चुरशीची लढाई सुरु होती. शेवटच्या टप्प्यापर्यंत कोण बाजी मारणार हे निश्चित दिसत नव्हतं. इतकंच काय तर इव्हीएम मशिनमधील मतमोजणीत रविंद्र वायकर फक्त एका मताने आघाडीवर होते. तर पोस्टल बॅलेटमध्ये त्यांना 47 मतांची मदत झाली आणि त्यांनी अमोल किर्तीकर यांना 48 मतांनी पराभूत केलं. आता रविंद्र वायकर लोकसभेत शिवसेनेची बाजू मांडताना दिसतील.
कोण आहेत रवींद्र वायकर?
शिवसेनेचे रवींद्र वायकर हे 1992 मध्ये पहिल्यांदा महापालिकेवर निवडून गेले. त्यानंतर चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग 20 वर्षे त्यांनी नगरसेवकपद भूषवलं. इतकंच काय तर पक्षाने त्यांची कामगिरी पाहून 2006-2010 या काळात स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलं. त्यांची कामगिरी पाहून त्यांना विधानसभेत पाठवण्याचा पक्षाने निर्णय घेतला. 2009, 2014 आणि 2019 सलग तीन टर्म जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ख्याती होती. 2014 साली शिवसेना भाजपा सरकार आलं तेव्हा त्यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री म्हणून कार्यभार सोपवण्यात आला. त्यानंतर 2019 साली स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर यांच्याकडे कॅबिनेट येईल अशी शक्यता होती. मात्र गृहनिर्माण राज्यमंत्रिपदावर त्यांची बोळवण करण्यात आली. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात वायकर यांची मोठी ताकद आहे. त्यांनी ती लोकसभेत दाखवून दिली.
एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात शिवसेना गेल्यानंतरही रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच होते. ठाकरे गटाकडून त्यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड, हिंगोली, परभणी या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. असं असताना त्यांच्यावर या काळात काही गैरव्यवहाराचे आरोप झाले. ईडीकडून त्यांनी वारंवार चौकशीही झाली. दरम्यान, रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. 10 मार्च 2024 रोजी त्यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र वायकर यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली. एकीकडे गजानन किर्तीकर यांचे पूत्र अमोल किर्तीकर रिंगणात असताना त्यांना ही लढत कठीण जाणार असं सांगितलं जात होतं. अगदी झालंही तसंच..मतमोजणीत अवघ्या 48 मतांच्या फरकांनी वायकर जिंकले. रवींद्र वायकर यांना 4,52,644 मतं पडली, तर अमोल किर्तीकर यांना 4.52,596 मतं पडली. अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर यांनी बाजी मारली. आता एनडीए सरकारमध्ये वायकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.