UP Elections | उत्तर प्रदेशात मतदानानंतर गाडीत आढळले EVM, कैराना येथे खळबळ, तपासानंतर काय उघड झालं?
निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी इकरा हसन आणि सपाच्या इतर नेत्यांसमोर EVM ची तपासणी केली तेव्हा वेगळेच वास्तव समोर आले. शामली जिल्ह्यातील एडीएम संतोष कुमार सिंह यांनी मीडियाला सांगितले की, कैराना येथील झोनल मॅजिस्ट्रेट एमपी सिंह यांच्या गाडीत EVM ठेवण्यात आले होते.
लखनौ | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील (UP Assembly Election) पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी 10 फेब्रुवारी रोजी घेण्यात आले. हे मतदान (Voting) झाल्यानंतर काही तासातच या परिसरातील एका अज्ञात वाहनात EVM सापडल्याने एकच खळबळ उडाली. मतदानाचे हे मशीन कुणी नेले, कुठे घेऊन जात होते, यावर राजकीय चर्चा, आरोपांना उधाण आले. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कैराना विधानसभा मतदार (Kairana) संघात हे EVM आढळले. गंभीर बाब म्हणजे, हे EVM ज्या गाडीत होते, त्या गाडीवर नंबर प्लेटदेखील नव्हती. त्यामुळे याविषयी अनेक शंका व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्याचे मतदान झाले असून यात सर्वाधिक मतदान कैराना विधानसभा मतदारसंघातच झाले आहे.
समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्याने पाहिले…
आजतकच्या मिलन शर्मा यांच्या रिपोर्टनुसार, समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम गाडीत EVM पाहले. त्यानंतर त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना फोनवर ही माहिती दिली. त्यानंतर सपाचे उमेदवार नाहीद हसन यांची बहीण इकरा हसन यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी यावरून तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर एसडीएम आणि इतर अधिकाऱ्यांनी EVM विषयीचा तपास सुरु केला.
तपासानंतर काय समोर आले?
निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी इकरा हसन आणि सपाच्या इतर नेत्यांसमोर EVM ची तपासणी केली तेव्हा वेगळेच वास्तव समोर आले. शामली जिल्ह्यातील एडीएम संतोष कुमार सिंह यांनी मीडियाला सांगितले की, कैराना येथील झोनल मॅजिस्ट्रेट एमपी सिंह यांच्या गाडीत EVM ठेवण्यात आले होते. ते एक रिझर्व्ह EVM होते. गाडीत बसलेल्या लोकांनी मेरठ येथे एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गाडी थांबवली होती. त्यावेळी काही लोकांनी EVM पाहिले. मात्र त्यांच्या गाडीला नंबर प्लेट का नव्हती, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. सदर प्रकरणाचा तपास सुरु असून यात कुणी दोषी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
https://t.co/ohwzU8lRKK pic.twitter.com/CzPiEsGJhf
— Sunil Kumar Yadav (@sunilazhindia) February 11, 2022
कैराना येथे सर्वाधिक मतदान
गुरुवारी 10 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. यात राज्यातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान झाले. त्यात शामली, मुजफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाजियाबाद, हापूड, गौतमबुद्धनगर, बुलंदशहर, अलीगड, मथुरा आणि आगरा यांचा समावेश होता. निवडणुक आयोगानुसार, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये 60.17 टक्के मतदानाची नोंद झाली. पहिल्या टप्प्यातील मतदानात कैराना येथेच सर्वाधिक मतदान झाले. येथे 75.12 टक्के मतदान झाले. तर गाजियाबादमध्ये सर्वात कमी 45 टक्केच मतदान झाले.
इतर बातम्या-