लखनऊ: उत्तर प्रदेशात (Uttar pradesh)सध्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहेत. उत्तर प्रदेशाचं तख्त राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. रोड शो, रॅली आणि डोअर टू डोअर भेटीगाठींवर सर्वच राजकीय पक्षांनी जोर दिला आहे. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव (akhilesh yadav) यांनी रोडशोवर अधिक भर दिला आहे. तर उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी गेल्या दोन निवडणुकांपासून परिश्रम घेणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीही (priyanka gandhi) मैदानात उतरल्या आहेत. गंमत म्हणजे एका रोड शो दरम्यान हे दोन्ही नेते आमने-सामने आले. दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. एकमेकांना हातजोडून नमस्कारही केला. यावेळी सपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जणू घोषणा युद्धच रंगलं होतं. दोन्ही नेते प्रचारा दरम्यान आमनेसामने आल्याचा हा व्हिडीओ खुद्द प्रियंका गांधी यांनी ट्विट केला आहे. तसेच माझ्याकडून राम राम अशी कमेंटही प्रियंका गांधी यांनी केली आहे.
बुलंदशहरात हा योगायोग घडून आला. सपा नेते अखिलेश यादव या ठिकाणी प्रचार करत होते. त्यांच्यासोबत आरएलडी प्रमुख जयंत चौधरीही होते. त्याचवेळी प्रियंका गांधी यांचा ताफा तिथे दाखल झाला. दोन्ही नेते आमनेसामने आले. प्रियंका गांधी हे ओपन जीपमध्ये होत्या. तर अखिलेश यादव बसवर उभे होते. दोन्ही नेत्यांचा ताफा आमनेसामने आल्यावर दोघेही थांबले. दोघांनीही एक दुसऱ्यांना हात हलवून नमस्कार केला. हे दृश्य पाहून दोन्ही कार्यकर्त्यांना स्फूरण चढले. त्यांनी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. दोन्ही नेत्यांना प्रचार रॅलीत आमनेसामने पाहून काही कार्यकर्त्यांचे मोबाईल चमकू लागले. धाड धाड व्हिडीओ शूट करून तात्काळ व्हायरलही करण्यात आले.
त्यानंतर अखिलेश यादव यांनी दोन्ही नेते समोरासमोर आल्याचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यावर दुआ सलाम, तहजीब के नाम… अशी कमेंट केली. त्यावर प्रियंका गांधी यांनीही हा व्हिडीओ ट्विट करत आमचाही राम राम अशी कमेंट केली.
हे दोन्ही नेते प्रचारात एकत्र आल्याचा व्हिडीओ व्हायर झाल्यानंतर आता चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची आघाडी नसली तरी दोन्ही पक्षात अंडरस्टँडिंग असल्याची जोरदार चर्चा आहे. या दोन्ही पक्षात पॉलिटिकल अंडरस्टँडिंग सुरू असल्याचं सांगितलं जातं. ज्या करहलमधून अखिलेश यादव लढत आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसने एकही उमेदवार दिला नाही. त्यावरून सपा आणि काँग्रेसमध्ये आतून आघाडी झाल्याचं बोललं जात आहे. जसवंत नगर मतदारसंघातही काँग्रेसने उमेदवार दिला नाही. त्यामुळे सपाचे शिवपाल यादव यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर दुसरीकडे अमेठी आणि रायबरेलीत समाजवादी पार्टीकडून उमेदवार देण्यात आला नाही. त्यामुळे आघाडी न करता झालेल्या या अंडरस्टँडिंगची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
हमारी भी आपको राम राम @jayantrld @yadavakhilesh pic.twitter.com/RyUmXS4Z8B
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 3, 2022
संबंधित बातम्या:
यूपी विधानसभा 2022: असदुद्दीन ओवेसी बिघडवू शकतात अखिलेश यादवांचा खेळ
Explained | भाजपाला तिकीटं कापल्याचा फटका महाराष्ट्रात बसला होता, यूपीमध्ये काय होणार?
Nawab Malik | जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा; भाजप नेते रवी किशन यांची नवाब मलिकांनी उडवली खिल्ली