काँग्रेसला पुन्हा केंद्रात सत्तेत यायचे असेल तर भाजपचा फॉर्म्युला स्वीकारावा लागेल तेव्हाच सत्तेत पुन्हा येणे शक्य आहे, असा सल्ला ट्विटरवरून नाराजी व्यक्त करत हरीश रावत यांनी दिला आहे. हरीश रावत हे उत्तराखंडमध्ये सध्या विरोधी दलात आहेत. ते उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्रीही आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्तेत यायचे असेल तर काँग्रेसला स्थानिक नेते मोठे करावे लागतील आणि भाजपची रणनिती स्वीकारून पुन्हा सत्तेत यावे लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हरीश रावत काही दिवसांपासून नाराज
काँग्रेस नेते हरीश रावत हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. दिल्लीतल्या हायकमांडने हरीश रावत यांच्यासह प्रीतम सिंह यांनाही दिलीत बोलवले आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकाच्या अनुषगांना काँग्रेसने ही तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत प्रचाराची मुख्य धुरा संभाळण्यावरून काँग्रेसमध्ये सध्या नाराजीचे सूर उमटत आहेत. काँग्रेसमध्ये सध्या गटातटाच्या राजकारणाल उत आला आहे. काँग्रेसने सामूहिकरित्या निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर हरीश रावत यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. एका कॉन्क्लेव मध्ये हरीश रावत यांनी म्हटले आहे की, काँग्रेसला सत्तेतून हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपने आपल्या स्थानिक नेत्यांना मोठे केले. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा सत्तेत यायचे असल्यास हाच फॉर्म्युला राबवावा लागणार आहे.
राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठीचा फॉर्म्युला
राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपचा फॉर्म्युला स्वीकारावा लागेल असेही रावत म्हणाले आहेत. राहुल गांधी 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान बनू शकतात असेही वक्तव्य केले आहे. राहुल यांच्याकडे उत्तम विचारधारा आणि नेतृत्व आहे असेही ते म्हणाले आहेत. आगामी निवडणुकीआधी हरीश रावत यांनी सोशल मीडियावरून ही नाराजी व्यक्त केल्याने आता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. रावत यांनी ट्विट करत काँग्रेसला जणू घरचा अहेरच दिला आहे. त्यामुळे पार्टीचे हे डॅमेज कंट्रोल रोखण्याचे आव्हान आता काँग्रेस नेतृत्वासमोर असणार आहे, त्यासाठी काँग्रेसकडे तेवढा सक्षम प्लॅन असण्याचीही गरज आहे. त्यामुळेच काँग्रेसने हरीश रावत यांना दिल्लीत बोलवले आहे. त्यांची नाराजी समजून घेण्यात आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे. निवडणूक सर्वेक्षणानंतर रावत यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कारण राज्यातील जनतेने त्यांना चांगले मुख्यमंत्री झाल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीतही जनता रावत यांनाच राज्याची धुरा देईल अशी चर्चाही सुरू आहे. जेवढे ओपिनियन पोल आले आहेत, त्यात हरीश रावत हे पहिल्या पसंतीचे नेते आहेत. त्यामुळे काँग्रेसलाही अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.