पश्चिम बंगालचा ट्रेंड बदलला; 6 वर्षे बंगालमध्ये ठाण मांडून बसलेले कैलास विजयवर्गीय म्हणतात…
पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी भाजप गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न करत आहे. | West Bengal Election Results 2021
कोलकाता: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे (West Bengal Results 2021) चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे. मतमोजणीला साडेतीन तास उलटून गेल्यानंतर आता तृणमलू काँग्रेस सहजपणे सत्तास्थापन करेल, अशी चिन्ह दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या प्रचारयंत्रणेचे प्रमुख असलेले कैलास विजयवर्गीय यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (West Bengal Election Results 2021 LIVE Updates)
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेवटच्या दोन-तीन टप्प्यांत भाजपचा मतदार बाहेर पडला नाही. त्यामुळे आम्हाला मोठा फटका बसताना दिसत आहे. तर भाजपचे अनेक दिग्गज नेतेही पिछाडीवर आहेत. यामध्ये बाबूल सुप्रियो, लौकिक चॅटर्जी आणि स्वपन दासगुप्ता यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. यापैकी बाबूल सुप्रिया पिछाडीवर पडणे, ही बाब आमच्यासाठीही आश्चर्ययाची असल्याची कबुली कैलास विजयवर्गीय यांनी दिली.
पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी भाजप गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न करत आहे. त्यासाठी कैलास विजयवर्गीय हे गेल्या सहा वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून होते. दोन वर्षांपूर्वी ते बंगालमध्येच स्थायिक झाले होते. या निवडणुकीसाठी भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा कामाला लावली होती. भाजपचे अनेक नेते गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून होते. मात्र, इतक्या प्रयत्नानंतरही 100 चा आकडा ओलांडताना भाजपची दमछाक होताना दिसत आहे.
भाजपचं ‘अबकी बार 200 पार’चं स्वप्न उद्ध्वस्त
या निवडणुकीत भाजप 200 पेक्षा अधिक जागा मिळवून सत्तेत येईल, असा दावा भाजपचे नेते अमित शाह यांनी केला होता. या निवडणुकीसाठी अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये 15 प्रचारसभा आणि रोड शो केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पश्चिम बंगालमध्ये विक्रमी गर्दीच्या सभा घेतल्या होत्या. मात्र, भाजपला याचा म्हणावा तसा फायदा झालेला नाही.
(West Bengal Election Results 2021 LIVE Updates)