आसाम-पुद्दुचेरीत बहुमत, केरळातही भोपळाही फोडला नाही, भाजपची विधानसभा निवडणुकीत स्थिती काय?
केरळमध्ये LDF ने सत्ता राखली, तर पुद्दुचेरीमध्ये भाजपप्रणित एनडीएने काँग्रेसला धोबीपछाड दिली (Five States Assembly Election Final Result)
मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (5 states election final result) काल जाहीर झाला. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee TMC) तृणमूल काँग्रेसने विजयाची हॅट्ट्रिक केली. आसाममध्ये (Assam result) भाजपला सत्ता राखण्यात यश आलं. केरळमध्ये (Kerala result) LDF ने सत्ता राखली, तर तामिळनाडूत (Tamil nadu result) एआयडीएमकेची सत्ता पालटली असून द्रमुकने मोठा विजय मिळवला. तर पुद्दुचेरीमध्ये (Puducherry ) भाजपप्रणित एनडीएने काँग्रेसला धोबीपछाड दिली. (Five States Assembly Election Final Result 2021 BJP Congress TMC)
पुद्दुचेरीमध्ये काय झालं?
पुद्दुचेरी विधानसभेच्या सर्व 30 जागांसाठी विधानसभा निवडणूक 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. 10.04 लाख मतदारांपैकी जवळपास 82 टक्के जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
अखिल भारतीय एनआर कॉंग्रेस (एआयएनआरसी) आणि भाजप मिळून पुद्दुचेरीमध्ये पुढील सरकार स्थापन करणार आहेत. भाजप प्रणित NDA ने 16 जागा जिंकत 30 सदस्यीय विधानसभेतील बहुमताचा जादूई आकडा पार केला. एआयएनआरसीने एकूण 16 मतदारसंघात उमेदवार उभे केले होते, तर भाजपने नऊ जागांवर निवडणूक लढवली होती.
पुद्दुचेरीमधील पक्षीय बलाबल 2021
- NDA -16
- काँग्रेस – 02
- DMK – 06
- इतर – 06
- एकूण 30
केरळमध्ये भाजपला भोपळाही नाही
केरळ विधानसभा निवडणुकीत लेफ्टिस्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने ऐतिहासिक विजय मिळवला. माकपच्या नेतृत्वात डाव्या लोकशाही आघाडीने (एलडीएफ) 99 जागा जिंकून सत्ता कायम राखली. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) 41 जागांवर समाधान मानावे लागले.
140 सदस्यीय केरळ विधानसभेत भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) एकही जागा मिळवू शकली नाही. 2016 मध्ये तिरुअनंतपुरममधील नेमोम मतदारसंघाची जिंकलेली एक जागा टिकवून ठेवण्यासही त्यांना अपयश आलं.
कोणत्या पक्षाची कशी कामगिरी ?
डाव्या लोकशाही आघाडीमध्ये माकपने अपक्ष उमेदवारांसह 68 जागा जिंकल्या. त्यांचे सर्वात जवळचे सहयोगी भाकपने 17 जागा जिंकल्या, तर डाव्यांत नव्याने सहभागी झालेल्या केरळ काँग्रेसने लढवलेल्या 12 पैकी 5 जागा जिंकल्या. जनता दल (सेक्युलर) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) यांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या. तर लोकतांत्रिक जनता दलाने लढलेल्या तीन जागांपैकी फक्त एक जागा जिंकली. केरळ काँग्रेसने (बी) आपली जागा राखून ठेवली, तर इंडियन नॅशनल लीग (आयएनएल) आणि काँग्रेस (सेक्युलर) यांनी एक जागा जिंकली.
मुख्य विरोधी काँग्रेसला लढलेल्या 91 जागांपैकी केवळ 21 जागा जिंकता आल्या. यूडीएफचे भागीदार इंडियन युनियन मुस्लिम लीगने (आययूएमएल) देखील निवडणूक लढवलेल्या 27 जागांपैकी 15 जागा जिंकून निराशा केली. केरळ काँग्रेसने दोन जागा जिंकल्या, तर केरळ काँग्रेस (जेकब), राष्ट्रीय सेक्युलर परिषद आणि भारतीय क्रांतिकारक मार्क्सवादी पार्टी (आरएमपी) यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली.
भाजपच्या दिग्गजांना पराभवाचा झटका
पिनरयी विजयन यांच्या नेतृत्वासमोर काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही मुख्य विरोधक निष्प्रभ ठरले. भाजपमधील दोन जागांवर निवडणूक लढवणारे वरिष्ठ नेते कुम्मनम राजशेखरन, प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन, तसेच सोभा सुरेंद्रन आणि मेट्रोमॅन ई श्रीधरन यांना पराभवाचा सामना करावा लागला.
केरळमधील पक्षीय बलाबल 2021
- LDF – 94
- काँग्रेस – 39
- भाजप – 00
- इतर – 07
- एकूण – 140
आसाममध्ये भाजपला सहज बहुमत
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आसाम विधानसभा निवडणुकीत सहज बहुमत मिळवले. एकूण 126 मतदारसंघांपैकी 75 जागा जिंकून राज्यात सरकार स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजपाने एकूण 60 जागा मिळवल्या, एकूण मतांच्या जवळपास 33.2 टक्के मतं त्यांना मिळाली, तर मित्रपक्ष असम गण परिषद (एजीपी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल (यूपीपीएल) यांनी अनुक्रमे नऊ आणि सहा जागा जिंकल्या.
काँग्रेसला 29 जागा (29.7 टक्के मतांचा वाटा) मिळवण्यात यश आले, तर महाजोथचे मित्रपक्ष एआययूडीएफने 16 आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटने चार जागा जिंकल्या. भाकपने एक जागा मिळवली. रविवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी सोमवारी पहाटे 5:40 वाजता संपली.
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय बाकी
मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी माजुली मतदारसंघ जिंकला, तर आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जलुकबारी जागा एक लाखाहून अधिक मतांनी जिंकली. पुढच्या मुख्यमंत्र्यांविषयीचा निर्णय भाजपच्या संसदीय मंडळाकडून घेणार असल्याचे सरमा म्हणाले. तुरुंगवासी अखिल गोगोई यांनीही सिबसागर सीटवरुन विजय मिळवला.
आसामधील पक्षीय बलाबल 2021
- भाजप + – 75
- काँग्रेस + – 50
- अन्य – 1
- एकूण – 126
संबंधित बातम्या
2021 Vidhan Sabha Election Results : नंंदीग्राममधून ममता दीदींचा पराभव, सुवेंदू अधिकारी विजयी
5 States Result : पाच राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा? 5 राज्यांचा संपूर्ण निकाल
(West Bengal Kerala Puducherry Tamil nadu Assam Five States Assembly Election Final Result 2021 BJP Congress TMC)