बघतोच तुला कोण…; होळी पार्टीत नशेत धूत असलेल्या कोस्टारने अभिनेत्रीसोबत केले चुकीचे कृत्य
फिल्म इंडस्ट्रीमध्ये होळी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. एका टीव्ही अभिनेत्रीला होळी पार्टीमध्ये खूप वाईट अनुभव आला आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये होळी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. सोशल मीडियावर कलाकारांच्या होळीचे फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, एका अभिनेला एक वाईट अनुभव आला आहे. या २९ वर्षीय अभिनेत्रीने कोस्टरवर छेड काढण्याचा आरोप केला आहे. तसेच त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे देखील सांगितले आहे. अभिनेत्रीने या प्रकरणी पोलिसात देखील तक्रार दाखल केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईतील एका होळी पार्टीमध्ये घडली आहे. अभिनेत्रीने दावा केला आहे की या पार्टीत तिच्या कोस्टारने नशेत जबरदस्ती रंग लावण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीने सतत नकार देऊनही तो रंग लावत होता. इतर महिलांनाही त्याने जबरदस्तीने रंग लावण्याचा प्रयत्न केला. ‘मला त्याच्यासोबत होळी खेळायची नव्हती. त्यामुळेच मी यावर आक्षेप घेतला’ असे ती अभिनेत्री म्हणाली.




पुढे अभिनेत्री म्हणाली की, ‘मी टेरेसवर असलेल्या पाणीपुरी स्टॉलच्या मागे लपले होते. तरीही तो माझा पाठलाग करत तिथे पोहोचला आणि मला रंग लावण्याचा प्रयत्न करु लागला. मी माझा चेहरा झाकला, तरीही त्याने मला जबरदस्ती पकडले आणि माझ्या चेहऱ्यावर रंग लावला. तो मला आय लव्ह यू म्हणाला आणि मी पाहातोच तुला कोण वाचवतो असे म्हणाला. त्यानंतर त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि रंग लावला. मला मानसिक धक्काच बसला. मी तेथून पळत थेट बाथरुममध्ये गेले.’
अभिनेत्रीने तिच्या मित्रपरिवाला घडलेली घटना सांगितली. तिच्या मित्रपरिवाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशीही तो चुकीच्या पद्धतीने बोलू लागला. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कोस्टारला लीगल नोटीस पाठवली आहे.