मुंबई | 1 जानेवारी 2024 : अभिनेते नाना पाटेकर यांनी बॉलिवूडमध्ये आपला स्वतःचा असा वेगळा ठसा उमटविला आहे. नाना अशा कलाकारांपैकी एक आहेत की ज्यांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणाचीही मदत घेतली नाही. अडचणी आणि परिस्थितीवर मात करून नानांनी बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलं. अडचणी आणि परिस्थिती हेच त्यांचे खरे सहकारी आणि शिक्षक बनले. नाना पाटेकर यांच्या फिल्मी करिअरमध्ये जशा सुरवातीला अडचणी आल्या. त्यापेक्षा अधिक अडचणी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आल्या. कठोर आणि रागीट वाटणारे नाना यांच्या आयुष्यात असाही एक हळवा प्रसंग आला होता. ज्यामुळे त्यांच्यातील बाप माणूस जागा झाला.
नाना यांच्या उमेदीचा तो काळ होता. घरची परिस्थिती लाजिरवाणी होती. झेब्रा क्रॉसिंग रंगवून ते पैसे मिळवायचे. त्यातून घर चालायचे. मात्र, त्यांना अभिनयाची आवड होती. त्यातूनच ते थिएटरकडे वळले. थिएटरमध्ये कामे मिळू लागली. याच दरम्यान त्याची भेट नीलकांती यांच्याशी झाली. नीलकांती या अभिनेत्री होत्या त्याशिवाय बँकेत नोकरीही करत होत्या. त्यावेळी नीलकांती यांचा मासिक पगार २५०० रुपये तर नाना पाटेकर यांना एका शोसाठी ५० रुपये मिळायचे.
नाना आणि नीलकांती यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याचे लग्न अवघ्या 750 रुपयांमध्ये झाले. तर, लग्नानिमित्त दिलेल्या पार्टीचा खर्च अवघा 24 रुपये इतका होता. नीलकांती या उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. अभिनयाबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. पण, लग्नानंतर नीलकांती यांनी चित्रपटात काम करणे बंद केले.
नाना आणि नीलकांती यांच्या आयुष्यात एका चिमुकला पाहुण्याने प्रवेश केला. नानांना ही गुड न्यूज कळताच त्यांना खूप आनंद झाला. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. बाळाला त्यांनी पाहिलं आणि त्यांना धक्का बसला. त्याच क्षणी ते मुलापासून दूर झाले. त्यांची घालमेल सुरु झाली. ते नीलकांती यांना कळलं. पण त्याक्षणी नीलकांती शांत राहिल्या.
नवजात छोट्या बाळाचे ओठ जन्मतः काही अंशी कापले होते. त्यामुळे बाळाला शारीरिक व्यंग आलं होतं. याच कारणाने नाना नाराज झाले होते. काही दिवसानंतर त्यांनी आई आणि मुलाला घरी आणले. पण, नाना मुलाशी ना खेळत ना त्याची दखल घेत.
एकदा घरातले सगळे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. नाना आणि बाळ असे दोघेच घरी होते. काही वेळाने अचानक बाळ रडू लागलं. नाना उठून बाळाजवळ गेले. बाळाच्या डोळयातले अश्रू त्यांनी पाहिले आणि त्यांच्यातला बाप माणूस जागा झाला. याचवेळी त्यांना आपण किती चुकीचे वागलो याची जाणीव झाली. पण हे मुल जास्त काळ जगले नाही. अडीच वर्षाचे असताना बाळ गेलं आणि त्यादिवशी नाना हमसून हमसून रडले.