घटस्फोट जाहीर करताना वापरलेल्या हॅशटॅगवरून ए. आर. रेहमान ट्रोल; नेटकरी म्हणाले..

| Updated on: Nov 20, 2024 | 3:25 PM

संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर पत्नी सायरा बानो यांना घटस्फोट दिला आहे. सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट लिहित त्यांना सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. मात्र घटस्फोटाची पोस्ट लिहिताना त्यांनी जो हॅशटॅग वापरला, त्यावरून नेटकरी नाराज आहेत.

घटस्फोट जाहीर करताना वापरलेल्या हॅशटॅगवरून ए. आर. रेहमान ट्रोल; नेटकरी म्हणाले..
A R Rahman and Saira Banu
Image Credit source: Instagram
Follow us on

ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी पत्नीला घटस्फोट देत असल्याचं जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए. आर. रेहमान आणि सायरा बानो घटस्फोट घेत आहेत. रेहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. मात्र या पोस्टच्या अखेरीस त्यांनी जो हॅशटॅग वापरला, त्यावरून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. किमान घटस्फोटाच्या पोस्टसाठी तरी असा हॅशटॅग वापरू नये, असं मत नेटकऱ्यांनी नोंदवलं आहे. रेहमान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘लग्नाची तीस वर्षे गाठण्याची आमची आशा होती पण सर्व गोष्टींचा अनपेक्षित शेवट पहायला मिळतोय. आमच्या हृदयाच्या झालेल्या तुकड्यांच्या भाराने आज देवाचंही सिंहासन थरथर कापू शकतं. जरी हे तुकडे पुन्हा जोडता येत नसेल तरी या तुकड्यांमध्ये आम्ही आमच्या नात्याचा अर्थ शोधतोय.’

या पोस्टमध्ये रेहमान यांनी त्यांच्या मित्रपरिवाराचे आभार मानले. त्याचप्रमाणे या कठीण काळात त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आदर बाळगण्याची विनंती केली. तर पोस्टच्या अखेरीस त्यांनी ‘#arrsairaabreakup’ असा हॅशटॅग वापरला. याच हॅशटॅगवरून नेटकरी त्यांच्यावर टीका करत आहेत. ‘अशा परिस्थितीत कोण हॅशटॅग बनवतं’, असा सवाल एकाने केला. तर ‘तुमच्या अॅडमिनला कामावरून काढून टाका’, असं दुसऱ्याने लिहिलंय. ‘तुम्ही वेडे आहात का? घटस्फोटाच्या पोस्टनंतर असा हॅशटॅग कोण देतं’, अशा शब्दांत नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा

ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांनी 12 मार्च 1995 रोजी चेन्नईत लग्न केलं होतं. त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांनी अरेंज मॅरेज केलं होतं आणि आपल्या पत्नीसाठी त्यांनी तीन अटी ठेवल्या होत्या. अभिनेत्री सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत रेहमान यांनी याविषयीचा खुलासा केला होता. जोडीदार निवडण्यात त्यांच्या आईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

“प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर माझ्याकडे जोडीदार शोधण्यासाठी वेळ नव्हता. त्यावेळी मी माझ्या कामात खूप व्यस्त होतो. पण मला माहीत होतं की लग्नासाठी तीच योग्य वेळ होती. मी 27 वर्षांचा होतो आणि माझ्या आईला सांगितलं की तुम्हीच माझ्यासाठी जोडीदार शोधा. यासोबतच मी त्यांना माझ्या तीन अटी सांगितल्या होत्या. ती सुंदर असावी, सुशिक्षित असावी आणि त्याचसोबत स्वभावाने दयाळू असावी.. या माझ्या तीन अटी होत्या. सायरामध्ये माझ्या आईला हे तिन्ही गुण दिसले होते”, असं त्यांनी सांगितलं होतं.