अभिनेता आमिर अली आणि संजीदा शेख ही एकेकाळी टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. लग्नाच्या काही वर्षांनंतर या दोघांनी 2020 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 2021 मध्ये ते कायदेशीररित्या वेगळे झाले. या दोघांना आयरा ही मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत संजीदाने आमिरवर काही आरोप केले होते. “असे काही पार्टनर्स असतात जे तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काहीच करू शकत नाही, असं ते तुम्हाला सांगतात किंवा ते म्हणतात की तुम्ही एखादी गोष्ट करू शकणार नाही. अशा लोकांपासून दूरच राहिलेलं चांगलं असतं,” असं संजीदा म्हणाली होती. त्यावर आता आमिरने प्रतिक्रिया दिली आहे.
“ती आणि मी एकमेकांबद्दल जे काही बोलतो ते सर्व आमच्याबद्दलच असतं असं नाही. आम्ही आता जवळपास गेल्या पाच वर्षांपासून एकत्र नाही आहोत. कदाचित त्या कालावधीत तिला असा एखादा अनुभव आला असावा. आमची कथा खूप जुनी झाली आहे आणि ती संपली आहे. विभक्त होण्याच्या त्या कालावधीत मी कोणत्या परिस्थितीचा सामना केला आणि माझ्यासोबत काय झालं हे मलाच माहीत आहे. पण सार्वजनिकरित्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं हा माझा स्वभाव नाही. मी कधीच कोणाला कमी लेखलं नाही आणि खासकरून ज्या व्यक्तीसोबत माझं एक नातं होतं, त्यांच्यासोबत तसं करणारही नाही”, असं आमिर ‘न्यूज 18 शोशा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
आमिर आणि संजीदा यांची पहिली भेट ‘क्या दिल में है’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर सरोगसीद्वारे त्यांना मुलगी झाली. घटस्फोटानंतर संजीदाला मुलीचा ताबा मिळाला. एका मुलाखतीत आमिरने संजीदावर आरोप केला होता की ती त्याला त्याच्या मुलीला भेटू देत नाही.
घटस्फोटाबद्दल संजीदा म्हणाली, “माझ्यासोबत जे काही घडलं त्यातून मला बाहेर पडता आलं यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते. त्यावेळी मला असं वाटलं होतं की मीच सर्वांत नैराश्यग्रस्त व्यक्ती आहे किंवा मीच फार दु:खी आहे. माझ्यासोबत हे सर्व काय घडतंय? माझ्या आयुष्यासोबत हे काय झालं? पण त्या सर्व गोष्टींमधून बाहेर पडता आल्याने आणि स्वत:वर पुन्हा प्रेम करता आल्याने मी नशिबवान समजते.”