मुंबई : आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. या चित्रपटानंतर आमिरने त्याच्या करिअरबद्दल सर्वांत मोठा निर्णय घेतला होता. अभिनयातून काही काळ ब्रेक घेणार असल्याचं त्याने जाहीर केलं होतं. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरला त्याच्या कमबॅकविषयी प्रश्न विचारण्यात आला. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या तीन महिन्यांनंतर नोव्हेंबर 2022 मध्ये आमिरने ब्रेक घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. कुटुंबीयांना वेळ देण्यासाठी हा ब्रेक खूप महत्त्वाचं असल्याचंही तो म्हणाला होता.
‘कॅरी ऑन जट्टा 3’ या पंजाबी चित्रपटाच्या लाँचदरम्यान आमिरला त्याच्या कमबॅकविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “आज खरंतर फक्त कॅरी ऑन जट्टा याच चित्रपटाविषयी बोललं पाहिजे. मात्र तुम्ही सर्वजण फार उत्सुक असाल म्हणून मी तुम्हाला उत्तर देतो. मी सध्या तरी कोणताच चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे. मला सध्या माझ्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवायचा आहे. त्यांच्यासोबत राहून मला खूप बरं वाटतंय, कारण सध्या मला हेच करायचं आहे. मी जेव्हा भावनिकदृष्ट्या तयार असेन, तेव्हाच मी चित्रपटात काम करेन.”
“जेव्हा मी अभिनेता म्हणून चित्रपटात काम करतो, तेव्हा त्या कामात मी पूर्णपणे व्यग्र होऊन जातो. माझ्या जीवनात दुसरं काहीच उरत नाही. याच कारणामुळे मी ब्रेक घेतोय. मला माझ्या कुटुंबीयांसोबत राहायचंय. माझी आई, माझ्या मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. गेल्या 35 वर्षांपासून मी फक्त कामच करतोय. मी फक्त माझ्या कामाकडेच पूर्ण लक्ष देतोय आणि जे लोक माझ्या जवळचे आहेत, त्यांच्यासाठी ही बाब योग्य नाही”, असं तो म्हणाला होता. आमिरने अभिनयातून ब्रेक घेतला असला तरी निर्माता म्हणून तो त्याचं काम सुरूच आहे.
आमिरने कोरोना महामारीच्या काळातच फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला होता. मात्र ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हा कुठला मार्केटिंग फंडा आहे, असं वाटू नये म्हणून त्याने निर्णय जाहीर केला होता. आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव हिने त्याच्या या निर्णयाला विरोध केला होता. एका मुलाखतीत आमिरने याबद्दलचा खुलासा केला होता.