‘मला गोमांस खायला आवडतं”; रणबीर कपूरचे जुने वक्तव्य, अभिजीत भट्टाचार्यांनी चांगलंच सुनावलं
गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी रणबीर कपूरच्या गोमांस सेवनाबाबतच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी रणबीरला निमंत्रित केलं होतं त्यावर आक्षेप घेत त्यांनी आपला राग व्यक्त केला. त्यांनी अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा उल्लेख करत गोमांस सेवन आणि धार्मिक भावना यांच्यातील विरोधाभासावर प्रश्न उपस्थित केला.
सेलिब्रिटींचे आयुष्य हे सामान्य नागरिकांपेक्षा वेगळे असते. त्यांच्या राहण्याच्या सवयींपासून ते खाण्या-पिण्याच्या सवयी देखील फार वेगळ्या असतात. बऱ्याच सेलिब्रिटींना सर्व प्रकारचे मांसाहारी पदार्थ खायला आवडतात. अगदी बीफ म्हणजेच गोमांससुद्धा. याच मुद्द्यावरून गायक अभिजीत भट्टाचार्यांनी आपले मत मांडत राग व्यक्त केला आहे.
अभिजीत भट्टाचार्यांचा रणबीरवर संताप
अभिजीत भट्टाचार्य यांनी गोमांस खाणाऱ्या सेलिब्रिटींवर निशाना साधला आहे. ज्यात त्यांनी बऱ्याच जणांची नावे घेतली आहेत. त्यात त्यांनी प्रामुख्याने रणबीर कपूरचे नाव घेत राग व्यक्त केला. कारण रणबीरचं “मला मटन, पाया, बीफ आवडतं. रेड मीटही आवडतं,” हे त्याचं जुनं वक्तव्य ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आलं होतं. हाच मुद्दा धरून अभिजीत यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावरून त्यांनी संताप व्यक्त केला.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत रणबीरला बोलवल्याबद्दल आक्षेप
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत आता एका वर्षाने गायक अभिजीत भट्टाचार्य व्यक्त झाले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी रणबीर कपूरला देखील निमंत्रित करण्यात आलं होतं.
एका मुलाखतीत अभिजीत यांनी यावर नाराजी व्यक्त करत म्हटलं की, ‘राम मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हा गोमांस खाणाऱ्याला बोलावले होते आणि तुम्ही गायीला माता म्हणता.’ असं म्हणत त्यांनी रणबीरवर निशाना साधला होता
ते पुढे म्हणाले, ‘राममंदिर, अयोध्येतही असे लोक गेले, ज्यांच्या बायका भारताला शिव्या देतात आणि ते स्वत: पाकिस्तानविरुद्ध काही बोलत नाहीत. गोमांस खाणाऱ्या व्यक्तीला व्यक्ती म्हणतात, तर गायीला आपण माता म्हणतो. राजकारण ही खूप विचित्र गोष्ट आहे. मी कधीही राजकारणात येऊ शकत नाही. ही फक्त एक ओळ आहे की आम्हाला अभिमानाने सांगण्याचा अधिकार आहे की आम्ही हिंदू आहोत” अस् वक्तव्य करत त्यांनी आपला राग व्यक्त केला.
गोमांस खाण्याच्या रणबीरच्या वक्तव्यावरून अभिजित यांची टीका
अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, विक्की कौशल, आलिया भट्ट आणि आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी झाले होते. मात्र, गायक अभिजीत यांनी प्रामुख्याने रणबीर कपूरवर केलेल्या कमेंटमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. गोमांस खाण्याबाबत रणबीर कपूरची 2011 मध्ये त्याने केलेली कॉमेंट व्हायरल झाली होती.
त्याच्या 2022 मध्ये आलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती क्लिप पुन्हा एकदा समोर आली होती, ज्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. तोच मुद्दा धरून अभिजित यांनी पुन्हा एकदा रणबीरला सुनावले. रणबीरने केलेल्या या वक्तव्यामुळे आलिया भट्ट आणि त्याला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले होतं.
रणबीर काय म्हणाला होता?
‘रॉकस्टार’ या चित्रपटामध्ये रणबीर मुख्य भूमिकेत होता. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने त्याच्या खाण्यातील आवडत्या मांसाहार पदार्थांबद्दल सांगितले होते. तेव्हा तो असं म्हणाला होता की “मला मटन, पाया, बीफ आवडतं. रेड मीटही आवडतं,” हे अभिनेता रणबीर कपूरचं जुनं वक्तव्य ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या निमित्तानेही पुन्हा चर्चेत आलं होतं.