Allu Arjun : कसंबस केलं जेवण, बराकीतच मारल्या फेऱ्या…अल्लू अर्जुनची तुरुंगातील रात्र कशी गेली ?
Allu Arjun News: तेलंगणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी अभिनेता अल्लू अर्जुनला 21 जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. 'पुष्पा 2' च्या प्रीमियर दरम्यान थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी त्याला अटक केली होती.
शुक्रवारी दुपारी अल्लू अर्जून याला अटक झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. मात्र पुष्पा-2 च्या या स्टारला लगेचच जामीन मिळाला होता. पण त्यानंतरही अल्लू अर्जुन याला एक रात्र तुरूंगातच घालवावी लागली. ‘पुष्पा 2’ च्या प्रीमियर दरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास अल्लू अर्जुन याला अटक झाला मात्र त्यानंतर तेलंगणा हायकोर्टाने त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. साऊथच्या या सुरस्टारला एकही रात्र तुरुंगात रहावे लागू नये म्हणून त्याच्या टीमने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याच्या अटकेनंतर लगेचच ( जामीनासाठी) हायकोर्टातही धाव घेण्यात आली, त्याला तातडीने जामीनही मंजूर झाला. मात्र एवढी सगळी धावपळ होऊनही अल्लू अर्जुन याला शुक्रवारची रात्र जेलमध्येच काढावी लागली.
आता असा प्रश्न उपस्थित होतो की, तेलंगण हायकोर्टाने शुक्रवारीच अंतरिम जामीन मंजूर केला होता, मग तरीही अल्लू अर्जुन याला कालची रात्र तुरुंगात का काढावी लागली? त्याचं कारण म्हणजे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारागृह अधिकाऱ्यांना त्याच्या जामिनाची प्रत मिळू शकली नव्हती, सूत्रांच्या सांगण्यानुसार, जामीनाची प्रत जरी मिळाली असती तरी ती आधी तपासण्यात आली असती. त्यामुळे अशा परिस्थिथीत शुक्रवारी रात्रीच त्याची ( अल्लू अर्जन) सुटका शक्य नव्हती. त्यामुळेच आज, शनिवारी सकाळी सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अल्लू अर्जुन तुरुंगातून बाहेर आला. तत्पूर्वी, आदल्या दिवशी, उच्च न्यायालयाने अभिनेता अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि या प्रकरणाच्या तपासात अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते.
तुरुंगातील एक रात्र कशी गेली ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता अल्लू अर्जुन हा शुक्रवारी संध्याकाळपासून त्याच्या सुटकेची वाट पाहत होता. पण तरीही त्याला शुक्रवारची रात्र तुरुंगात काढावी लागली. जेलच्या नियमांनुसार त्याला रात्रीचे जेवण देण्यात आले. तसेच झोपण्यासाठी त्याला बेड आणि उशी देण्यात आली. रात्रभर तो थोडा अस्वस्थच दिसत होता असेही सूत्रांनी सांगितलं. कधी तो त्याच्या बराकीमध्ये फेऱ्या मारत होता तर कधी अस्वस्थ होऊन या कुशीवरून त्या कुशीवर वळत त्याने कशीबशी रात्र घालवली. आपल्या सुटकेची तो आतुरतेने वाट पहात होता, हे त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून दिसत होतं. त्याला नीट जेवणही गेलं नाही. रात्री उशीरापर्यंत अल्लू अर्जुन जागाच होता. तो आतमध्ये असताना तुरुंगाबाहेर मात्र त्याचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हैदराबाद पोलिसांकडून अटक
‘पुष्पा 2: द रूल’ चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान हैदारबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी शुक्रवारी हैजराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार कडक सुरक्षा व्यवस्थेत त्याची रवानगी चंचलगुडा तुरुंगात करण्यात आली. दरम्यान, अल्लू अर्जुन याच्या वकिलांनी हायकोर्टातून अंतरिम जामिनाचा आदेश घेतला होता. हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला त्याच्या घरातून अटक केली. याआधी पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली होती.
पोलिसांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापक, अभिनेता अल्लू अर्जुन तसेच त्याची सुरक्षा टीम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर 11 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात महिलेच्या मृत्यूप्रकरणी त्याच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती. शुक्रवारी स्थानिक न्यायालयाने अर्जुनला न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर लगेचच उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आणि प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारी 2025 पर्यंत पुढे ढकलली.
मृत महिलेच्या पतीचा मोठा निर्णय
याच दरम्यान चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या महिलेच्या पतीने एक मोठा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर या महिलेच्या पतीने केस मागे घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. आपल्या पत्नीच्या मृत्यूला आणि त्या चित्रपटात झालेल्या चेंगराचेंगरीला अल्लू अर्जुनला जबाबदार मानत नसल्याचं या महिलेच्या पतीनं म्हटलं . माझ्या मुलाला पुष्पा 2 चित्रपट पाहायचा होता, म्हणून मी त्याला चित्रपट गृहात घेऊन गेलो. तेव्हा तिथे अल्लू अर्जुन आले, मात्र त्यामध्ये त्यांची काहीच चूक नव्हती, मी माझी केस मागे घेण्यास तयार आहे, असे त्यांनी नमूद केलं.