Amitabh Bachchan : बिग बी असतील बाहेर… महानायक बच्चनही बायकोला घाबरतात; अमिताभ म्हणाले, मला तिचा मार नाही खायचा…
बिग बी अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा शो जोरदार चालतोय. या शोमधून अमिताभ बच्चन हे स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती घेत असतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना दिलासाही देत असतात. तसेच या शोमधून आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करत असतात. जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. एका शोमध्ये त्यांनी अशाच प्रकारे एक किस्सा सांगितला. त्याची चर्चा आजही होत असते.
माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपल्या बायकोला घाबरतोच. बायकोच्या पुढे भल्या भल्याची गाळण उडत असते. मग जर त्याच्याकडून काही चूक झाली असेल आणि ती गंभीर असेल तर खैरच नाही. पण एरव्हीही बायकोचा घरात दबदबा असल्याने पुरुषांची बोलती बंद होते. शतकातील महानायक अमिताभ बच्चनही यातून काही सुटलेले नाहीत. खुद्द साक्षात बिग बी अमिताभ बच्चन यांनीच एक किस्सा सांगितला आहे. पत्नी जया बच्चन यांना आपण कसे घाबरतो हे त्यांनीच सांगितलंय.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी रिल लाइफमध्ये जशी हीट ठरली, तशीच रिअल लाइफमध्येही हीट ठरली आहे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक आदर्श जोडप्यांपैकी हे जोडपंही आदर्श असं जोडपं आहे. अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत जया बच्चन यांच्या स्वभावाबद्दल सांगितलं होतं. जया बच्चन या मुलांपेक्षा माझ्यासोबत अधिक कठोर वागतात, असं अमिताभ म्हणाले होते. कौन बनेगा करोडपती 15च्या एका एपिसोड दरम्यान त्यांनी ही गोष्ट सांगितली होती. या शोमध्ये अमिताभ यांच्यासमोर जया पटेल नावाची एक स्पर्धक बसली होती. जया पटेल या शिक्षिका होत्या. यावेळी त्यांच्याशी चर्चा करताना अमिताभ यांनी हसत हसत हा किस्सा ऐकवला होता.
मला मार नाही खायचा
जया पटेल यांनी अमिताभ यांच्यासमोर त्यांच्या स्वभावाची माहिती दिली. मी शाळेत कठोर आहे. पण घरात नम्र आहे, असं जया पटेल यांनी सांगितलं होतं. त्यानंतर जया पटेल यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारलं. तेव्हा अमिताभ म्हणाले, माझा अनुभव… माझी पत्नी कठोर आणि उदार आहे.
मला भीती वाटतेय
त्यानंतर अमिताभ पुढे म्हणाले, मी वाचलो, मला घरी जायचं आहे. मला मार खायचा नाही. म्हणून जेव्हा त्या कठोर होतात तेव्हा चांगली गोष्ट ही की तुम्ही घराच्या आतच राहावं. तुमच्या खोलीत बंद राहावं. किंवा थोड्यावेळासाठी बाहेर निघून जावं. जेव्हा त्या शांत असतात तेव्हा मला बरं वाटतं. त्या मुलं आणि इतरांच्याबाबतीत असंच वागतात. पण माझ्याशी वागताना त्या अधिक कठोर होतात. तुम्ही मला हा प्रश्न का केला? जेव्हा मी त्यांच्यासोबत हा शो पाहिन तेव्हा त्या माझ्यावर रागावतील. मला भीती वाटतेय. त्यामुळेच मी माझ्या खासगी आयुष्याबाबत अधिक बोलत नाही, असं अमिताभ बच्चन यांनी हसत हसत सांगितलं होतं.