Actor Asif Basra suicide : ‘काय पो छे’मधील आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या, आसिफ बसराने आयुष्य संपवलं!
‘काय पो छे’ चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसोबत सहकलाकाराच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या (Actor Asif Basra suicide) केली आहे.
मुंबई : या वर्षात बॉलिवूडने अनेक दिग्गज गमावले आहे. या धक्क्यातून सावरत असतानाच, मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का बसला आहे. ‘काय पो छे’ चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसोबत सहकलाकाराच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या (Actor Asif Basra suicide) केली आहे. हिमाचल प्रदेशातील मॅकलॉडगंजमधील जोगीवाडा रोडवरील कॅफेजवळ असिफ यांनी आपले आयुष्य संपवले.
आसिफ यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. मात्र, मागील काही काळापासून ते नैराश्यात होते. आसिफ यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मुळचे अमरावतीचे असणारे आसिफ बसरा हे गेल्या 5 वर्षांपासून मॅकलॉडगंज येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची परदेशी मैत्रीण देखील राहत होती.
माध्यमांच्या वृत्तानुसार गुरुवारी (12 नोव्हेंबर) दुपारी आसिफ आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, त्याच कुत्र्याच्या पट्ट्याने गळफास घेत त्यांनी आयुष्य संपवले (Actor Asif Basra suicide) .
Film actor Asif Basra was found hanging in a private complex in Dharamshala. Forensic team is at the spot and police is investigating the matter: SSP Kangra Vimukt Ranjan. #HimachalPradesh (Picture credit: Asif Basra’s website) pic.twitter.com/nxpWNLi8VU
— ANI (@ANI) November 12, 2020
आसिफ बसरा कोण आहेत?
अभिनेते आसिफ बसरा यांनी निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘ब्लॅक फ्रायडे’मध्ये आणि राहुल ढोलकीया यांच्या ‘परझानिया’ चित्रपटांत केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. यानंतर त्यांचं भरपूर कौतुकही झालं. विशेष म्हणजे त्यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘काय पो छे’ या चित्रपटातही भूमिका केली होती.
आसिफ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज अभिनेत्यांसोबतही काम केलं होतं. ते मिचेल ओ साजबेलंड यांच्या ‘वन नाईट विथ किंग’ या चित्रपटातही झळकले होते. या चित्रपटात त्यांनी ओमर शरिफ आणि पेटर ओ टूल यांच्यासोबत काम केलं.
आसिफ बसरा यांनी 2010 च्या गाजलेल्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या चित्रपटात शोएब या पात्राची भूमिका केली होती, ज्यात ते इमरान हाश्मीच्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. त्यांनी ‘लम्हा’ या हिंदी चित्रपटातही दमदार भूमिका केली होती.
(Actor Asif Basra suicide)