कॉलर पकडून बाहेर काढायचे, लीड ॲक्टर्सबरोबर जेवायची नव्हती परवानगी ! नवाजुद्दीनने केली बॉलिवूडची पोलखोल
बॉलिवूडमध्ये कसा भेदभाव केला जातो हे सांगत नवाजुद्दीन सिद्दीकीने पोलखोल केली आहे. त्याने त्याच्यासोबत झालेल्या एका घटनेचाही उल्लेख केला आहे.
मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील सशक्त अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण सध्या तो त्याच्या अभिनय आणि कामापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. आज तो एक मोठा स्टार आहे, पण एक काळ असा होता जेव्हा तो छोटे-मोठे रोल करायचा. सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला, अशी आठवण नवाजुद्दीन ( Nawazuddin Siddiqui) सांगतो. एवढंच नव्हे तर त्याला बॉलीवूडमध्ये (bollywood) भेदभावाचाही सामना करावा लागला आहे. याबद्दल खुद्द अभिनेत्यानेच खुलासा केला आहे.
तेव्हा हातात पैसेच नव्हते
एका घटनेचा संदर्भ देत नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितले की, त्याला एकदा भेदभावाला सामोरे जावे लागले होते. तो मुख्य अभिनेत्यांसोबत जेवायला गेला होता. मात्र तेव्हा त्याची कॉलर धरून बाहेर काढण्यात आले होते. ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा मी माझं नाव व्हावं, काम मिळावं यासाठी संघर्ष करत होतो, असे नवाजुद्दीनने सांगितले. एक काळ असा होता जेव्हा दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती, अशी आठवणही नवाजुद्दीनने सांगितली.
अभिनेत्यासोबत असा झाला भेदभाव
नवाजुद्दीनने एका मुलाखतीत खुलासा केला की, ‘मी स्पॉट बॉयकडे पाणी मागायचो, पण तो माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचा. मग मी स्वतः पाणी आणायला जायचो. बॉलीवूडमध्ये अशी अनेक प्रॉडक्शन हाऊस आहेत जी चित्रपटातील कलाकार आणि क्रू यांच्याशी वेगळ्या पद्धतीने वागतात. अनेक ठिकाणी सर्वजण एकत्र जेवतात, पण अनेक ठिकाणी जेवणासाठी वेगळी व्यवस्था केली जाते. ज्युनियर आर्टिस्ट वेगळ्या ठिकाणी खातात. सहाय्यक कलाकारांना वेगळे अन्न दिले जाते आणि मुख्य भूमिका करणाऱ्या म्हणजेच लीड ॲक्टर्सना वेगळे जेवण दिले जाते. मुख्य कलाकार जिथे जेवतात, तिथे जाऊन जेवण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला, पण माझी कॉलरने पकडून मला तिथून हाकलण्यात यायचे, मला तेव्हा खूप राग यायचा, दु:ख व्हायचे असा खुलासा त्याने केला.
नवाज पुढे म्हणाला, ‘मला या बाबतीत यशराज फिल्म्सचे कौतुक करायचे आहे कारण तिथे सगळे एकत्र जेवतात. पण अनेक प्रॉडक्शन हाऊसनी एक श्रेणी तयार केली आहे.’ नवाजचे हे वक्तव्य समोर आल्यापासून सोशल मीडियावर अनेक चाहते बॉलिवूडमधील या संस्कृतीला चुकीचे म्हणत टीक करत आहेत.
View this post on Instagram
50 रुपये उधार मागितले होते
आणखी एका घटनेची बोलताना नवाजने सांगितले की, त्याने एका ज्येष्ठ अभिनेत्याकडून 50 रुपये उधार मागितले होते. तेव्हा त्या ज्येष्ठ अभिनेत्याची स्थितीही फारशी चांगली नव्हती. त्यांच्याकडेही (पैशांची) तंगी होती. तेव्हा त्या ज्येष्ठ अभिनेत्याकडे फक्त 100 रुपये होते, त्यातील 50 रुपये त्याने नवाजला दिले. आम्हा दोघांना एकमेकांच्या स्थितीबद्दल इतकी दया आली आणि आम्ही दोघेही रडलो, असे नवाजने सांगितले.
नवाजुद्दीन अलीकडेच ‘जोगिरा सा रा रा’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट गेल्या महिन्यातच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाने नवाजुद्दीनला वेगळी ओळख मिळाली, त्यानंतर त्याला एकापाठोपाठ एक अप्रतिम चित्रपट मिळू लागले.