‘रॉक ऑन’फेम अभिनेत्याला कोरोना, पत्नी-मुलांनाही लागण

| Updated on: Apr 08, 2020 | 12:56 PM

अभिनेता पूरब कोहलीची पत्नी ल्युसी, मुलगी इनाया आणि मुलगा ओशन अशा चौघा जणांचे अहवाल 'कोरोना' पॉझिटिव्ह आले होते, मात्र सर्वांची प्रकृती सुधारत आहे (Actor Purab Kohli corona)

रॉक ऑनफेम अभिनेत्याला कोरोना, पत्नी-मुलांनाही लागण
Follow us on

लंडन : बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता पूरब कोहली याला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. पूरबने आपल्या संपूर्ण कुटुंबाला ‘कोरोना’ झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. सुदैवाने कोहली कुटुंबातील सर्व जण ‘कोरोना’मुक्त होत आहेत. (Actor Purab Kohli corona)

रॉक ऑन, माय ब्रदर निखिल, वो लम्हे, एअरलिफ्ट यासारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये पूरब कोहलीने काम केलं आहे. पूरबने याआधी व्हीजे म्हणूनही काम केलं आहे. नुकताच तो काही वेब सीरीजमध्येही झळकला होता.

पूरबची पत्नी ल्युसी, मुलगी इनाया आणि मुलगा ओशन अशा चौघा जणांचे अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आले होते. पूरब कोहली कुटुंबासोबत सध्या लंडनमध्ये आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून आम्ही घरातच विलगीकरणात होतो, असं पूरबने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करुन सांगितलं.

पूरब कोहलीची इंस्टाग्राम पोस्ट काय?

आम्हाला नुकताच फ्लू झाला होता. मात्र आमच्या लक्षणांनुसार डॉक्टरांनी ‘कोविड 19′ असल्याचं निदान केलं. सामान्य फ्लूसारखीच लक्षणं दिसतात, फक्त कफ अधिक असतो आणि श्वास घेताना त्रास होतो. मुलगी इनायाला थोडासा खोकला आणि सर्दी होती. दोन दिवसांनंतर पत्नी ल्युसीलाही छातीत दुखू लागलं. तिच्यानंतर मलाही मोठ्या प्रमाणात सर्दी झाली. एका दिवसात सर्दी बरी झाली, मात्र यानंतर मला प्रचंड खोकला जाणवू लागला. आम्हा तिघांच्या शरीराचं तापमान 100 ते 101 इतकं होतं. पण इनायाला तीन दिवस 104 पर्यंत ताप होता. तिचं नाक सर्दीने सतत वाहत होतं आणि खोकलाही होता. पाचव्या दिवशी तिचा ताप उतरला.’ असं पूरबने लिहिलं आहे.

आता आम्हाला ‘कोरोना’ व्हायरसची लागण नाही. गेल्या गुरुवारी आमचा क्वारंटाइन कालावधी संपला, असं सांगतानाच पूरबने घरगुती उपायही सुचवले आहेत. ‘दिवसातून चार ते पाच वेळा आम्ही गरम पाण्याच्या गुळण्या करायचो. आलं, हळद आणि मध खाल्ल्यामुळेही फार आराम पडला. याशिवाय कोमट पाण्याची बाटली आम्ही छातीवर ठेवायचो. यामुळे थोडं बरं वाटायचं. गरम पाण्याने आंघोळ केल्याचाही आम्हाला फायदा झाला. दोन आठवड्यानंतरही शरीर रिकव्हर होत असल्याचं आम्हाला जाणवतं. देव न करो, पण तुम्हाला लागण झालीच, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रत्येक केस वेगळी असते. आपण कृपया घरी रहा आणि शरीराला आराम द्या.’ असं आवाहन पूरबने केलं आहे. (Actor Purab Kohli corona)

हॉलिवूड अभिनेता टॉम हॅन्क्स आणि त्याची पत्नी- अभिनेत्री आणि गायिका रिटा विल्सन, ब्रिटीश अभिनेता इदरीस एल्बा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांची पत्नी सोफी ग्रेगोअर ट्रूडो हे आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेले काही नामांकित व्यक्ती आहेत. भारतीय खाद्यसंस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे भारतीय शेफ फ्लॉयड कार्डोज यांचा मृत्यू झाला. (Actor Purab Kohli corona)