व्हिसेरा रिपोर्ट म्हणजे काय भाऊ? कसा आणि का होतो तपास? ; सतिश कौशिक यांच्या मृत्यूचं गूढ उकलणार?
Satish Kaushik Death Reason : कोणत्याही मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकत नाही. अशा स्थितीत व्हिसेरा तपासूनच सविस्तर अहवाल मिळू शकतो.
नवी दिल्ली : बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. रिपोर्ट्सनुसार, बुधवारी त्यांनी दिल्लीतील बिजवासन येथील त्यांच्या फार्महाऊसवर होळी साजरी केली. रात्री त्यांची प्रकृती खालावली आणि रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू (death) झाला. हृदयविकाराच्या झटक्याने सतिश कौशिक यांचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जात आहे. मात्र पोलीसांना याबाबत वेगळाच संशय येत असून ते या प्रकरणाचा सखोल तपास (investigation) करत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत पोलिसांनी काही नवे अपडेट्स दिले आहेत. साऊथ वेस्ट दिल्ली येथील फार्म हाऊसमध्ये होळीची पार्टी होती. याच होळीच्या पार्टीत सतिश कौशिकही सहभागी झाले होते. पोलिसांनी या फार्म हाऊसचा कसून तपास केला असता पोलिसांना काही संदिग्ध औषधांची पाकिटे मिळाली आहेत. या पाकिटांचा सतीश कौशिक यांच्या मृत्यूशी काय संबंध आहे याचा पोलीस तपास करत आहेत. सध्या पोलीस सविस्तर पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. यासोबतच ते व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्याच्या मृतदेहाचा व्हिसेरा तपासासाठी जतन करण्यात आला असून, त्यामध्ये मृत्यूचे खरे कारण समजू शकेल.
व्हिसेरा म्हणजे काय ?
व्हिसेरा हा शरीराचा असा भाग आहे ज्यावरून मृत्यूची कारणे शोधता येतात. यासाठी मृतदेहाच्या विशिष्ट भागांचे काही नमुने सुरक्षित ठेवण्यात येतात, जयाद्वारे त्यांची संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी करता येईल. पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टरही त्यांच्या स्तरावर व्हिसेरा सुरक्षित करतात. विशेषतः जेव्हा शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण शोधता येत नाही, तेव्हा डॉक्टरांना अधिक सखोल चाचणीची गरज भासते आणि त्यासाठी ते मृत शरीराचा व्हिसेरा जतन करतात.
हत्या किंवा विवाद असल्यास होतो तपास
कोणत्याही मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकत नाही. अशा स्थितीत व्हिसेरा तपासूनच सविस्तर अहवाल मिळू शकतो. मृत्यूच्या प्रकरणांमध्ये जिथे हत्येचा संशय आहे किंवा मृत्यूच्या कारणांबद्दल आणखी वाद होण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत व्हिसेरा तपासणी आवश्यक ठरते. अनेकवेळेस हृदयविकाराचा झटका, दम्याचा झटका, उच्च रक्तदाब इत्यादी मृत्यूचे कारण सांगितले जाते, परंतु नंतर व्हिसेरा अहवालात मृत्यूचे खरे कारण रसायन, खाणेपिणे किंवा अन्य काही असल्याचे दिसून येते.
कशी केली जाते व्हिसेरा चाचणी ?
व्हिसेरा हा फॉरेन्सिक तपासणीचा भाग असतो. सामान्यतः फॉरेन्सिक शास्त्रज्ञ व्हिसेरा तपासतात. यासाठी शवविच्छेदनादरम्यान शरीराच्या अंतर्गत अवयवांची तपासणी करून त्यांचे नमुने सुरक्षित ठेवण्यात येतात. वास घेऊन, पिऊन किंवा खाण्याद्वारे कोणतेही रसायन शरीरात गेल्यावर त्याचा परिणाम मानवाची छाती, पोट इत्यादी अवयवांवर नक्कीच होतो.
व्हिसेरा नमुन्याच्या रासायनिक तपासणीदरम्यान, “प्रभावित अवयवांच्या नमुन्यात रासायनिक किंवा विषाचा प्रभाव” आढळून येतो. व्हिसेरा चाचणीसाठी, पोस्टमॉर्टम दरम्यान घेतलेल्या नमुन्याची 15 दिवसांच्या आत चाचणी करणे आवश्यक आहे. यामध्ये मृत व्यक्तीचे रक्त, वीर्य इत्यादी तपासले जाते.
कायदेशीर मान्यता
व्हिसेरा तपासणीनंतर फॉरेन्सिक सायन्स तज्ज्ञांनी तयार केलेल्या अहवालाला कायदेशीर मान्यता असते. सुप्रीम कोर्टाने आपल्या एका निर्णयात संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणांमध्ये मृतदेहांची व्हिसेरा तपासणी करणे बंधनकारक केले आहे. जर व्हिसेरा अहवालात मृत व्यक्तीच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विष किंवा रसायन असल्याची पुष्टी होत असेल, तर पोलीस किंवा या प्रकरणाचा तपास करणारी अन्य तपास यंत्रणा त्याला नैसर्गिक मृत्यू घोषित करू शकत नाही. कोणत्याही संशयास्पद मृत्यूच्या बाबतीत खरे कारण शोधण्यासाठी व्हिसेरा तपासणी ही सर्वात विश्वासार्ह पद्धत मानली जाते.