नागपूरच्या राड्याला जबाबदार कोण?; विकी कौशल आणि नितेश राणेंचं नाव घेत अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत
सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आहे. त्याने या पोस्टमध्ये नागपूरमध्ये झालेल्या राड्याला कोण जबाबदार आहे याविषयी वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादाला १७ मार्च रोजी हिंसक वळण आले. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री याच मुद्यावरुन दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड, वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले. अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दगडफेक करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना पोलीसही जखमी झाले. दगडफेकीच्या घटनेत 8 ते 10 पोलीस जखमी झाले. आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले. औरंगजेबच्या कबरीचा वाद हा ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सुरु झाला. आता यावर एका अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत आहे.
बिग बॉस १३मध्ये सहभागी झालेला अभिनेता आणि राजकीय विश्लेषक तहसीन पूनावालाने ट्विटरवर ‘या सगळ्याला विकी कौशल नाही तर थर्ड ग्रेड अभिनेत्री जबाबदार आहे’ अशी टिप्पणी केली. आता हा अभिनेता नेमकं काय म्हणाला जाणून घ्या…




वाचा: कुणी तरी येऊन सांगितलं… चला हिंदूंना मारायला… मुस्लमानांना…; किरण मानेची नागपूर दंगलीवरून टीका
‘ज्याने छावासारखा ब्लॉकबस्टर हिट सिनेमा दिला आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली त्या अभिनेत्याला, विकी कौशलला नागपूरमधील राड्यासाठी जबाबदार धरण्यात येत आहे. हे फारच खेदजनक आहे. एखादी कला मग ते सिनेमा असो, पुस्तक असो किंवा सर्जनशीलता असो त्याच्यात दंगल भडकावण्याची ताकद नसते. ही कला फक्त समाजाला आरखा दाखवून देऊ शकते ना की आग पेटवू शकते. जर सिनेमात प्रॉब्लम असेल तर तो पाहू नका किंवा चांगला बनवण्याचा प्रयत्न करा, कोणाला पुस्तक आवडलं नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करा किंवा याहून अधिक चांगली कथा लिहा’ असे अभिनेता म्हणाला.
It is utterly deplorable to pin the blame for the Nagpur riots on Vicky Kaushal’s stellar portrayal of Chhatrapati Sambhaji Maharaj or the blockbuster film Chhava. Art—be it a movie, a book, or any creative expression—does not wield the power to ignite violence; it is merely a… pic.twitter.com/qIZYfqJDoe
— Tehseen Poonawalla Official 🇮🇳 (@tehseenp) March 19, 2025
पुढे तो म्हणाला, ‘हिंसा करणे हा कोणाचाही अधिकार नाही. या सगळ्यामागचा खरा गुन्हेगार हा अबु आजमी आणि तिसऱ्या दर्जाची अभिनेत्री आहे. त्यांनीच केवळ उजव्या विचारसणीच्या लोकांना विरोध करायचा म्हणून औरंगजेबाचा उदो उदो केला. इतकच नाही तर महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे आणि तेलंगणाचे आमदार टी राजा यांनीही आगीत तेल ओतले. तुम्ही लक्षात घ्या, आजमींचे, नितेश राणेंचे आणि टी राजांची मुले या दंगलीत रस्त्यावर नव्हती. कारण विशेषाधिकार असलेल्या या लोकांनी अराजकता निर्माण केली आणि याचा त्रास गरिबांना सहन करावा लागला. हा द्वेष पसरवणे थांबूया. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंदचा नारा देऊया. रमजानच्या या महिन्यात एकमेकांनाच आपले कुटुंब समजून एकत्र येऊन आलिंगन देऊया. भारत अविभाजितरित्या विकास करो आणि समृद्ध होवो.’