येस, मलाही राजकारणात यायला आवडेल, प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक थेट बोलली; पक्ष कोणता?
प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक काल परभणीत होती. दहीहंडी स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मानसीच्या हस्ते पुरस्काराचं वाटप करण्यात आलं. मानसीच्या नृत्याचा कार्यक्रमही याप्रसंगी पार पडला. यावेळी मानसीने अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे.
विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून सर्वच इच्छुकांनी सेटिंग लावण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी मतदारसंघ पिंजून काढण्यावर भर दिला आहे. काही इच्छुकांनी तर आपल्याला पक्षात तिकीट मिळणार नाही याचा अंदाज घेऊन दुसऱ्या पक्षात जाण्यास सुरुवात केली आहे. सध्या राजकारणात आयाराम गयारामची चलती सुरू आहे. असं असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक हिनेही राजकारणात येण्याचे संकेत देऊन बार उडवून टाकला आहे.
अभिनेत्री मानसी नाईक परभणीत आली होती. भाजपच्या दहीहंडी फोड स्पर्धेसाठी मानसी नाईक आली होती. यावेळी तिला राजकारणात येणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावेळी येस, हो… असं उत्तर दिलं. मलाही भविष्यात राजकारणात यायला आवडेल, असं मानसीने सांगितलं. पण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे मात्र तिने गुलदस्त्यात ठेवलं आहे. त्यामुळे तरुणाईच्या काळजाची धडकन असलेली मानसी नाईक कोणत्या पक्षातून लढणार? कोणत्या मतदारसंघातून लढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ते माझे, मी त्यांची
तुम्हाला कोणता नेता आवडतो? असा सवालही तिला करण्यात आला. त्यावर तिने कसलेल्या राजकारण्यासारखं गोलमटोल उत्तर दिलं. कोणता ठराविक राजकारणी मला आवडतो हे सांगायला अजून मी लहान आहे. मात्र राजकारण असो वा कुठलंही क्षेत्र, प्रत्येकजण आपल्या मेहनतीने तिथपर्यंत पोहोचतो. मी कुणा एकाचं नाव घेऊ इच्छित नाही. त्यांच्याच प्रेमापोटी आम्ही कलाकार येतो. ते सर्व माझे आहेत. मी त्यांची आहे, असंही तिने स्पष्ट केलं.
मला परत यायला आवडेल
परभणीत येऊन मला खूप छान वाटतंय, असं मानसी नाईक म्हणाली. मला परभणीत बोलावलं, परभणीकरांना भेटण्याची संधी मिळाली. गोड वाटतंय. इकडे येऊन वेगळीच वाईब आली. पॉझिटिव्हीटी पाहायला मिळाली. कार्यक्रमाचं आयोजन खूप चांगलं होतं. लोकंही छान आहेत. मला इकडे पुन्हा यायला आवडेल, असं मानसीने सांगितलं.
टाळ्या आणि शिट्ट्या…
भारतीय जनता पक्षाकडून परभणीत दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानसी नाईक प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. यावेळी मानसीच्या नृत्याचा बहारदार कार्यक्रम झाला. मानसीची अदाकारी पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. टाळ्या आणि शिट्ट्यांनी संपूर्ण मैदान दुमदुमून गेलं होतं. यावेळी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी दहीहंडी स्पर्धेच्या पारितोषिकांचं वितरण मानसीच्या हस्ते करण्यात आलं. राजे संभाजी संघाने दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. मानसीने या सर्व मंडळांसोबत फोटोही काढला.