मुंबई : सध्या अॅनिमल या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला असून बॉक्स ऑफिसवर त्यानं धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी देखील या चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शवली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी यांनी दमदार असा अभिनय केला आहे. सगळीकडे या कलाकारांच्या अभिनयाचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातंय. यामध्ये आता अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेननं देखील अॅनिमल चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे.
राजीव सेन हा एक यूट्यूब व्लॉगर आहे. त्यानं नुकत्याच अपलोड केलेल्या त्याच्या व्लॉगमध्ये अॅनिमल चित्रपट त्याला कसा वाटला याबाबत सांगितलं आहे. तो म्हणाला की, मी अॅनिमल चित्रपटाचा प्रामाणिकपणे खरा रिव्ह्यू देऊ इच्छितो. या चित्रपटात रणबीरनं खूपच हिम्मतवाला आणि चॅलेंजिंग असा रोल साकारला त्यासाठी त्याला 10 पैकी 10 पॉइंट मिळतात. त्याला माझा सलाम आहे. तसंच मला वाटतं की बर्फी या चित्रपटानंतरचा हा रणबीरचा सर्वात उत्कृष्ट असा अभिनय आहे.
पुढे मिस्टर बॉबी देओलबद्दल बोलायचं झालं तर, तो खूपच शानदार आहे. बॉबीजी आपण जेव्हा फ्लाईमध्ये भेटलो होतो तेव्हा आपण खूप गप्पा मारल्या होत्या. पण तुम्ही अॅनिमलमध्ये एकही शब्द न बोलता तुमच्या डोळ्यांनी आणि बॉडी लँग्वेजने दमदार असा अभिनय केला आहे. काहीही न बोलता प्रेक्षकांचं मन जिंकणं हे खूप खास आहे, असं राजीव म्हणाला.
राजीव पुढे म्हणाला की, या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही मला जर विचारलं की मला हा चित्रपट कसा वाटला तर मी सांगेन खूपच खराब. मी या चित्रपटाशी कनेक्ट होऊ शकलो नाही कारण या चित्रपटात खूपच हिंसा दाखवण्यात आली. लोकांना मारणे, त्यांना टॉर्चर करणे ही गोष्ट खूपच वेगळी आहे. तसंच हा चित्रपट खूपच मोठा होता असं मला वाटतंय. सोबतच या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि चित्रपटाचे पॉइंट पाहता हा खूपच खराब चित्रपट आहे.