मुंबई- दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट गेल्या एक-दीड महिन्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. आदिपुरुष हा चित्रपट ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित आहे. यातील कलाकारांचे लूक आणि व्हिएफएक्स पाहून अनेकांनी टीका केली. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी ट्विटरवर होऊ लागली. अखेर हा वाद पाहता निर्मात्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला. चित्रपटात काही बदल करणार असल्याचं ओम राऊतने स्पष्ट केलं. आता सैफ अली खानच्या लूकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
आदिपुरुष या चित्रपटात प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. जेव्हा टीझर प्रदर्शित झाला, तेव्हा त्यातील सैफचा लूक पाहून अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. आता निर्मात्यांनी या समस्येवर उपाय शोधल्याचं कळतंय.
सैफ अली खानच्या दाढी आणि मिशीवरून नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आता हाच लूक व्हिएफएक्सच्या मदतीने हटवला जाणार असल्याचं समजतंय. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सैफचा लूक डिजिटली बदलणार आहे. आदिपुरुषमध्ये काही बदल करण्यासाठी निर्मात्यांना आणखी 30 कोटींचा फटका बसणार आहे.
आदिपुरुष चित्रपटात कराव्या लागणाऱ्या बदलांमुळे प्रदर्शनाची तारीख पाच महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. आदिपुरुष हा चित्रपट आता 12 जानेवारी 2023 रोजी नाही तर 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘आदिपुरुष हा केवळ चित्रपट नाही तर प्रभू श्री राम यांच्याप्रती असलेली आमची श्रद्धा आणि आपल्या संस्कृती, इतिहासाप्रती असलेली वचनबद्धता आहे. प्रेक्षकांना चित्रपटाचा चांगला अनुभव देता यावा यासाठी आम्हाला चित्रपटावर आणखी काम करण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. देशाला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. तुमचं प्रेम, तुमची साथ मिळाली तर यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. आदिपुरुष आता 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे’, असं ट्विट ओम राऊतने केलं होतं.