मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला प्रदर्शनानंतर प्रेक्षकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अखेर निर्माते-दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग्स बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. टी-सीरिजच्या अधिकृत प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली आहे. त्याचसोबत संवादलेखक मनोज मुंतशीर यांनीदेखील ट्विट करत डायलॉग्स बदलणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘मी आणि चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांनी ठरवलंय की जे संवाद तुम्हाला खटकले आहेत, त्याविषयी आम्ही अभ्यास करू आणि या आठवड्यात सुधारित संवाद चित्रपटात समाविष्ट करू’, असं त्यांनी म्हटलंय. मात्र याच ट्विटमध्ये त्यांनी टीकाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे.
‘रामकथेतून पहिला धडा मिळतो तो म्हणजे प्रत्येक भावनेचा आदर करणे. योग्य-अयोग्य हे काळानुसार बदलतं, मात्र भावना तशीच राहते. आदिपुरुषमधील 4000 हून अधिक ओळींचे संवाद मी लिहिले आहेत. त्यापैकी पाच ओळींवरून काहींच्या भावना दुखावल्या आहेत. त्या शेकडो ओळींमध्ये जिथे श्रीरामाचा महिमा होता, माँ सीतेच्या पावित्र्याचं वर्णन होतं, त्यासाठी प्रशंसासुद्धा मिळाली पाहिजे होती. मात्र ते का मिळालं नाही माहीत नाही. माझ्याच भावंडांनी सोशल मीडियावर माझ्यासाठी असभ्य शब्द लिहिले’, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली.
या ट्विटमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘माझ्याच जवळच्या लोकांनी ज्यांच्या आदरणीय आईंनी टीव्हीवर अनेकदा माझ्या कविता ऐकल्या आहेत, त्यांनीच माझ्या आईसाठी अशोभनीय शब्द वापरले. मी विचार करत राहिलो की मतभेद असू शकतात, पण माझ्या बंधूंच्या मनात अचानक एवढा कडवटपणा कुठून आला की ते श्रीरामाच्या दर्शनालाच विसरले. प्रभू श्रीराम हे प्रत्येक आईला आपली आई मानत असे. शबरीच्या पायाजवळ ते असे बसले, जणू कौशल्याच्या चरणांजवळ बसले असतील.’
रामकथा से पहला पाठ जो कोई सीख सकता है, वो है हर भावना का सम्मान करना.
सही या ग़लत, समय के अनुसार बदल जाता है, भावना रह जाती है.
आदिपुरुष में 4000 से भी ज़्यादा पंक्तियों के संवाद मैंने लिखे, 5 पंक्तियों पर कुछ भावनाएँ आहत हुईं.
उन सैकड़ों पंक्तियों में जहाँ श्री राम का यशगान…— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 18, 2023
‘तीन तासांच्या चित्रपटात मी 3 मिनिटांसाठी तुमच्या कल्पनेपेक्षा वेगळं काहीतरी लिहिलं असण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी माझ्या कपाळावर सनातन-द्रोही लिहिण्याची तुम्हाला इतकी घाई का झाली हे मला कळलं नाही. तुम्ही जय श्री राम गाणं ऐकलं नाही का? शिवोहम ऐकलं नाही का? राम सिया राम ऐकलं नाही का? आदिपुरुषमधील सनातनची ही स्तुतीही माझ्या लेखणीतूनच जन्माला आली आहे. तेरी मिट्टी आणि देश मेरे ही गाणीसुद्धा मीच लिहिली आहेत’, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ही पोस्ट लिहिण्यामागचं उद्दिष्ट स्पष्ट करताना त्यांनी म्हटलं, ‘माझी तुमच्याशी काही तक्रार नाही. तुम्ही माझेच आहात आणि नेहमी राहणार. आपणच एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो तर सनातनाचा पराभव होईल. सनातन सेवेसाठी आम्ही आदिपुरुषची निर्मिती केली, जो तुम्ही मोठ्या संख्येने पाहत आहात आणि मला विश्वास आहे की भविष्यातही तुम्ही पहाल. ही पोस्ट का लिहिली? कारण माझ्यासाठी तुमच्या भावनेपेक्षा मोठं काहीच नाही. मी माझ्या डायलॉग्सची बाजू मांडण्यासाठी अगणित युक्तिवाद करू शकतो. परंतु यामुळे तुमचं दु:ख कमी होणार नाही. मी आणि चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक यांनी मिळून ठरवलं आहे की जे संवाद तुम्हाला खटकले आहेत, ते आम्ही आठवड्याभरात बदलू. त्याठिकाणी नवीन संवाद समाविष्ट करू.’