Adipurush: ‘रावणाने इस्लाम धर्म स्वीकारला का?’; ‘आदिपुरुष’चा टीझर पाहून भडकले नेटकरी

| Updated on: Oct 03, 2022 | 2:26 PM

प्रभासच्या 'आदिपुरुष'ची जोरदार चर्चा; 'या' कारणासाठी होतोय ट्रोल

Adipurush: रावणाने इस्लाम धर्म स्वीकारला का?; आदिपुरुषचा टीझर पाहून भडकले नेटकरी
'आदिपुरुष'चा टीझर पाहून भडकले नेटकरी
Image Credit source: Youtube
Follow us on

प्रभास, सैफ अली खान आणि कृती सनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’चा (Adipurush) टीझर नुकताच प्रदर्शित झाला. ओम राऊतने (Om Raut) या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. ओम राऊतच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘आदिपुरुष’कडून प्रेक्षकांना खूप जास्त अपेक्षा होत्या. मात्र टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची निराशा झाली. चित्रपटात प्रभासने राम, सैफ अली खानने रावण तर कृती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. टीझरमधील रावणाची (Ravan) भूमिका आणि लूक पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

आदिपुरुषच्या VFX वरूनही नेटकरी खूप ट्रोल करत आहेत. ओम राऊतचा हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. लंकेश रावणच्या भूमिकेत असलेल्या सैफच्या लूकला पाहून नेटकऱ्यांची निराशा झाली. सोशल मीडियावर त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. टीझरमधील रावणाच्या लूकवरून प्रचंड ट्रोलिंग केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

या ट्रोलिंगमुळेच सोशल मीडियावर ‘Ravan’ असा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. रावणाचा लूक मुघल शासकांसारखा केल्याची तक्रार नेटकऱ्यांनी केली आहे. सैफच्या या लूकची तुलना अल्लाउद्दीन खिल्जी, मोहम्मद गजनी, रिझवान यांच्या लूकशी केली जातेय.

रावण हा शिवभक्त होता आणि चित्रपटात सैफला अगदीच मॉडर्न लूक दिला गेलाय, असं काहींनी म्हटलंय. तर टीझरमधील रावण पाहून त्याने इस्लाम धर्म स्वीकारला की काय, असा प्रश्न पडतोय, अशा शब्दांतही खिल्ली उडवली गेली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाची तुलना रामानंद सागर यांच्या रामायणाशीही केली जातेय.

आदिपुरुषचा टीझर म्हणजे एखादा कार्टून फिल्म पाहिल्यासारखा वाटतोय, असंही एका युजरने म्हटलंय. तर आदिपुरुषचा टीझर पाहिल्यानंतर अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रसाठी मनात आदर निर्माण झाल्याचंही दुसऱ्याने लिहिलंय. व्हीएफएक्स आणि ॲनिमेशन यांमधला फरकच समजला नसल्याचं काहींनी म्हटलंय.

हा चित्रपट 2023 मध्ये विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 12 जानेवारी 2023 रोजी आदिपुरुष प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा बजेट तब्बल 500 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय.