नवी दिल्ली : फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) प्रोफेशनल लाईफमध्ये सध्या बरेच चढ-उतार सुरू आहेत. ‘जी ले जरा’ हा त्याचा महत्वाकांक्षी चित्रपट असून त्यामध्ये अनेक मोठ्या अभिनेत्री झळकणार होत्या. मात्र ज्या स्टार्ससोबत फरहान हा चित्रपट बनवण्याचा प्लान करत होत्या, त्यापैकी काही जणी एकेक कारणं काढून चित्रपटातून बाहेरच पडत आहेत. या चित्रपटाची फॅन्स आतुरतेने वाट पाहत होते. मात्र चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
या मल्टिस्टारर चित्रपटात प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट, तिघीही झळकणार होत्या. मात्र शूटिंग सुरू होण्यापूर्वीच प्रियांकाने (Priyanka Chopra) चित्रपटातून पाय काढून घेतला आहे. हे कमी होते म्हणून की काय आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफनेही (KatrinaKaif) या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे या चित्रपटाचे भविष्य अधांतरी आहे.
एवढंच नव्हे तर आलिया भट्टही या चित्रपटात काम करण्याबाबत दुविधेत असून चित्रपटाला जास्तच उशीर झाला तर तीही हा चित्रपट सोडू शकते. असं झालं तर मग चित्रपटाच्या तिनही मुख्य अभिनेत्री बाहेर पडल्यास या चित्रपटात झळकणार तरी कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
या महत्वाकांक्षी चित्रपटाची घोषणा करतानाच फरहानने प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट या तिघींचीही नावे जाहीर केली होती. त्या तिघींनीही सुरुवातीच्या काळात हा चित्रपट करण्यास होकार दिला होता. मात्र, जसजसा वेळ जाऊ लागला, तसा शूटिंगला उशीर होऊ लागल्याने आधी प्रियांका चोप्रा आणि कतरिनाही या चित्रपटासाठी फरहानला डेट देऊ शकत नाहीत. रिपोर्ट्सनुसार, शूटिंगच्या तारखांबाबत खूप त्रास होत होता. शूटिंगला सतत होत असलेल्या विलंबामुळे त्याचा परिणाम अभिनेत्रींच्या इतर प्रोजेक्टवरही होत आहे. त्यामुळे फरहानला आता चित्रपटातील भूमिकेसाठी नक्की कोणाला कास्ट करायचं, या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
आता कोण करणार मुख्य भूमिका ?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका चोप्रानंतर कतरिना कैफही या चित्रपटातून बाहेर पडली आहे. आता त्या दोघींच्या जागी अनुष्का शर्मा आणि कियारा अडवाणीला यांची नावे समोर येत असून त्यांना कास्ट करण्याची तयारी सुरू झाली आहे. चित्रपटाचे शूटिंग वेळेत सुरू झाले तर या चित्रपटात प्रथमच आलिया भट्ट, अनुष्का शर्मा आणि कियारा अडवाणी हे त्रिकूट दिसेल.