मुंबई : 27 फेब्रुवारी 2024 | एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाने जगभरात प्रचंड यश मिळवलं. केवळ प्रेक्षक-समीक्षकांकडूनच या चित्रपटाचं कौतुक झालं नाही, तर गोल्डन ग्लोब आणि ऑस्करसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने भारताची मान उंचावली. साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण या दोघांनी यामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्यासोबतच यामध्ये काही बॉलिवूड चेहरेसुद्धा पाहायला मिळाले होते. यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांचा समावेश होता. अजय देवगणने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. अवघ्या काही मिनिटांच्या या भूमिकेसाठी त्याने तगडं मानधन घेतल्याचा खुलासा आता झाला आहे. ही रक्कम पाहून तुमचेही डोळे विस्फारतील!
‘RRR’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. या चित्रपटात अजय देवगणने रामचरणचा ऑनस्क्रीन भाऊ अल्लुरी व्यंकटराम राजूची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेला अवघ्या काही मिनिटांचा स्क्रीन टाइम मिळाला होता. मात्र त्यासाठी त्याने भरभक्कम मानधन घेतलं होतं. ‘गेट्स सिनेमा’च्या एका पोस्टनुसार, अजय देवगणने या भूमिकेसाठी तब्बल 35 कोटी रुपये स्वीकारले होते. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलंय, ‘अजय देवगणने RRR या चित्रपटातील आठ मिनिटांच्या भूमिकेसाठी तब्बल 35 कोटी रुपये मानधन घेतलं होतं.’ म्हणजेच एका मिनिटासाठी त्याने 4.35 कोटी रुपये स्वीकारले होते. या पोस्टवर अद्याप निर्माते-दिग्दर्शिक एस. एस. राजमौली किंवा अजय देवगणकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.
#AjayDevgn Gets a Remuneration of 35 Crores For 8 Mins Role in #RRR 😳😳😳😳😳pic.twitter.com/151Bdh5i7I
— GetsCinema (@GetsCinema) February 25, 2024
RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ दाखवण्यात आला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
चित्रपटात अजय देवगण आणि आलिया भट्ट या दोघांनी साकारलेल्या भूमिकेचा आवाका मोठा नसला तरी त्यांनी या भूमिकांना योग्य तो न्याय दिला आहे. आलिया आणि अजयच्या जागी इतर दाक्षिणात्य कलाकारसुद्धा घेतले जाऊ शकत होते, मग या दोघांचीच निवड का? तर यामागेही दिग्दर्शक म्हणून राजामौली यांचा एक वेगळा दृष्टीकोन होता. अर्थात हा दृष्टीकोन निव्वळ व्यावसायिक पैलूचा असला तरी प्रेक्षकांना फारसा खटकला नाही.