मुंबई : अभिनेता अक्षय कुमार कायम कोणत्या न कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. अक्षय कुमार हा एक प्रसिद्ध अभिनेता तर आहेच, पण खिलाडी कुमार एक उत्तम व्यक्तिमत्त्व देखील आहे. अक्षय कुमार खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे तर कायम चर्चेत असतो. पण अनेकदा अभिनेता गरजूंची मदत करण्यासाठी देखील एक पाऊल पुढे असतो. आता देखील अभिनेत्याने एका २५ वर्षीय तरुणीची मदत केली आहे. २५ वर्षीय तरुणीच्या उपचारासाठी अभिनेत्याने तब्बल १५ लाख रुपयांचं दान केलं आहे.
अक्षयने यापूर्वी देखील अनेकांची मदत केली आहे. रिपोर्टनुसार अक्षय कुमारने आयुषी शर्मा या २५ वर्षीय मुलीच्या उपचारासाठी १५ लाख रुपये दान केले आहेत. अक्षयने १५ लाख रुपये दिल्याची माहिती आयुषीचे आजोबा योगेंद्र अरुण यांनी दिली आहे. आयुषीचे आजोबा यांनी सांगितलं की, ‘आम्ही या गोष्टीची माहिती ‘सम्राट पृथ्वीराज’ सिनेमाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश यांना दिली होती.’
आयुषीच्या प्रकृती माहिती अक्षयला मिळाल्यानंतर अभिनेत्याने आयुषीच्या उपचारासाठी १५ लाख रुपये दान केले आहेत. योगेंद्र अरुण म्हणाले, ‘अक्षयकडून मी एकाच अटीवर पैसे घेईल, जर तो मला आभार मानन्याची संधी देईल.’ सध्या अक्षय आयुषीला केलेल्या मदतीमुळे तुफान चर्चेत आहे.
आयुषी दिल्लीमध्ये राहत असून तिच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयुषीचे आजोबा 82 वर्षांचे सेवानिवृत्त प्राचार्य आहेत आणि आयुषीच्या हृदय प्रत्यारोपणासाठी किमान 50 लाखांचा खर्च डॉक्टरांनी सांगितला आहे. अशात 15 लाखांव्यतिरिक्त आणखी कोणत्याही गोष्टीची गरज पडल्यास अक्षयने साथ देण्याचं आश्वासन दिलं आहे. असं देखील आयुषीच्या आजोबांनी सांगितलं आहे.
अक्षय कायम अनेकांची मदत करण्यासाठी पुढाकार घेत असतो. अक्षयच्या मदतीमुळे आणि पुढाकारामुळे आयुषी आणि तिच्या कुटुंबाला नवीन प्रेरणा मिळाली आहे. अक्षय कुमार फक्त सिनेमांमध्येच नाही, तर सामाजिक, स्वास्थ्य आणि शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करतो. ज्यामुळे अभिनेत्याचं कायम कौतुक होत असतं.