होय, मी अपशब्द म्हणालो पण त्यापेक्षा मोठी शिवी..; अक्षय कुमार असं का म्हणाला?

| Updated on: Apr 04, 2025 | 1:48 PM

'केसरी 2' या चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षय कुमारने म्हटलेल्या अपशब्दावरून वाद निर्माण झाला आहे. त्यावर त्याला प्रश्न विचारण्यात आला असता अक्षयने रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. हा चित्रपट जालियानवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे.

होय, मी अपशब्द म्हणालो पण त्यापेक्षा मोठी शिवी..; अक्षय कुमार असं का म्हणाला?
Akshay Kumar
Image Credit source: Instagram
Follow us on

अक्षय कुमार, अनन्या पांडे आणि आर. माधवन यांच्या बहुप्रतिक्षित ‘केसरी चाप्टर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी 3 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. जालियानवाला बाग हत्याकांडावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. यापूर्वी चित्रपटाच्या टीझरमधील अक्षयच्या एका डायलॉगने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यामध्ये अक्षय अपशब्द बोलताना दिसला होता. आता ट्रेलर लाँचदरम्यान अक्षयने त्यावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे त्याचे वडील आणि आजोबा त्याला त्या दु:खद आणि भयानक घटनेबद्दलच्या गोष्टी कशा सांगितल्या होत्या, याविषयी तो मोकळेपणे व्यक्त झाला.

ट्रेलर लाँचदरम्यान एका पत्रकाराने अक्षयला टीझरमधील अपशब्दाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “होय, मी तो अपशब्द वापरला आहे. मला आश्चर्य वाटतंय की त्या अपशब्दाने तुमचं लक्ष वेधलं, परंतु “तुम्ही अजून गुलाम आहात” या डायलॉगने कोणाचंच लक्ष वेधलं गेलं नाही. तुमच्यासाठी ही सर्वांत मोठी शिवी नाहीये का? त्यापेक्षा मोठी शिवी अजून कोणती असूच शकत नाही. तुम्ही त्या अपशब्दाबद्दल बोलण्याऐवजी त्यांनी ‘गुलाम’ हा शब्द वापरलाय असं म्हटलं असतं तर मला आनंद झाला असता. अशा वेळी जर त्यांनी गोळीसुद्धा मारली असती तरी त्याने काहीच वाटलं नसतं.”

हे सुद्धा वाचा

यावेळी अक्षयने असंही सांगितलं की त्याच्या वडिलांचा जन्म जालियानवाला बागेजवळ झाला होता आणि त्याच्या आजोबांनी ही दुर्घटना स्वत: पाहिली होती. “माझा जन्म अमृतसरमध्ये नाही तर जुन्या दिल्लीत झाला. हा चित्रपट माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक आणि महत्त्वाचा आहे. माझ्या वडिलांचा जन्म जालियानवाला बागेच्या अगदी समोर झाला होता, तिथे एक आलू कटरा गल्ली आहे. खरंतर माझ्या आजोबांनी त्यांच्या आजूबाजूला हे सर्व घडताना पाहिलं होतं. आम्ही अत्यंत रागाच्या भावनेनं हा चित्रपट बनवला आहे. मी माझ्या वडिलांकडून कथा ऐकल्या आहेत, त्यांनी त्या माझ्या आजोबांकडून ऐकल्या आहेत. दिग्दर्शक करणनेही मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत”, असं तो पुढे म्हणाला.

जालियानवाला बाग हत्याकांडाचे परिणाम आणि वकील सी. शंकरन नायर यांच्या नेतृत्वाखालील कोर्टरुम लढाई ‘केसरी 2’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. करण सिंग त्यागी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 18 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.