अक्षय कुमारच्या ‘बडे मियां, छोटे मियां’ चित्रपटाच्या मेकअप आर्टीस्टवर फिल्मसिटीत बिबट्याचा हल्ला, रूग्णालयात उपचार सुरू, चित्रनगरीत घबराट
अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी चित्रपट 'बड़े मियां छोटे मियां'चे शुटींग सुरू असताना मेकअपमनवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी चित्रपट ‘बड़े मियां छोटे मियां’चे शुटींग असताना मेकअपमनवर गोरेगाव चित्रनगरीत बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या मेकअपमनला रूग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने चित्रपट कलाकारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ‘बड़े मियां छोटे मियां’चे शुटींग गोरेगाव चित्रनगरीत हेलीपॅड टेकडी परीसरात सुरू आहे.
अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘बड़े मियां छोटे मियां’चे शुटींग गोरेगावच्या चित्रनगरी सुरू आहे. रात्री एका मित्राला सोडायला गेलेल्या मेकअपमन श्रवण विश्वकर्मा ( वय27 ) यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. त्यात श्रवण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने दवाखाण्यात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे समजते. त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसने उचलला आहे.
मेकअपमन श्रवण विश्वकर्मा आपल्या मित्राला सोडायला बाईकवरून गेले होते. परत येत असताना त्यांच्या बाईकवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याचे सूत्रांनी सांगितले. मेकअप आर्टीस्ट श्रवण याने आजतक वाहिनीला सांगितले की, माझ्या मित्राला सोडायला आपण बाईकवरुन फिल्मसिटीच्या चित्रीकरण स्थळाच्या बाहेर गेलो होतो. परतत असताना एक डुक्कर रस्त्यावरून अचानक समोरून क्रॉस करताना आपल्याला दिसले. त्यामुळे आपण येथून पटकन निघण्यासाठी बाईकचा वेग वाढविला. आपल्या अचानक एक बिबटा त्या डुकराचा पाठलाग करताना दिसला. त्यामुळे आपली त्याच्याशी धडक झाली. त्यानंतर आपण खाली पडल्याचे आणि बिबटा आपल्या भोवती फिरत असल्याचेच आपल्याला आठवत आहे. मी त्यानंतर बेशुद्ध झाल्याने आपल्याला आणखी काही आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्थानिक लोकांनी त्यानंतर आपल्याला दवाखान्यात दाखल केल्याचे जखमी आर्टीस्ट श्रवण यांनी म्हटले आहे.
कलाकारांना संरक्षण देण्याची मागणी
ऑल इंडीया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी या प्रकरणाकडे सरकारने गंभीरतेने पहाण्याची विनंती सरकारला केली आहे. कलाकार या घटनेने घाबरले आहेत. चित्रनगरीत बिबट्यांपासून कलाकारांना संरक्षण मिळायला हवे असे त्यांनी सांगितले. चित्रपटनगरीत बिबटे पुन्हा पुन्हा नागरिकांवर हल्ले करीत आहेत. येथे पुरेसे सुरक्षारक्षक आणि स्टाफही नसतो, फिल्मसिटीत हजारो लोक चित्रपटाच्या चित्रपटाच्या शुटींगसाठी येत असतात. तीन हजार एकरवर ही चित्रनगरी विस्तारली आहे, येथे अनेक ठिकाणी कुंपणे नाहीत. रस्त्यावर साधे पुरेसे दिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कलाकार जीव धोक्यात घालून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार जेथे या चित्रपटाचे शुटींग सुरू होते त्या हेलिपॅड एरीयात झाल्याचे त्यांनी सांगत कलाकारांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात यावे अशी मागणी सुरेश गुप्ता यांनी सरकारकडे केली आहे.