मुंबई : नेपोटिझम बद्दल विविध प्रकारच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. विशेषत: बॉलिवूडमधून (bollywood) या बातम्या अधिक येत असतात. इथे स्टार्सच्या मुलांना सहज चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. पण त्यांना पहिली संधी सहज मिळत असली तरी त्यांना स्वतःच्या कामाने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण करावे लागते. नेपोटिझममुळे संधी मिळू शकते, यश नाही. ते मिळवायचे की नाही, किती मेहनत करायची हे तुमच्या हातात असते. आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत आलिया भट्टचे (Alia Bhatt) नाव सामील झाले आहे. तिच्या बाबतीतही नेपोटिझमवरून (nepotism) खूप चर्चा होत असली तरी तिने अथक मेहनतीने तिचे एक स्थान बनवले आहे.
आलिया भट्टच्या करिअरचा ग्राफ पाहिला तर तिने गेल्या काही वर्षांत आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. इंडस्ट्रीतील तिची सुरुवात काही खास झाली नव्हती. आलियाने 2012 साली आलेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती हे सर्वांना माहीत आहे. या चित्रपटात तिने एका श्रीमंत कुटुंबातील मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून तिच्याच्यासोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही पदार्पण केले.
या चित्रपटातील कामासाठी सिद्धार्थ आणि वरुणचे कौतुक झाले होते, पण आलियाच्या अभिनयात एवढे काही खास दिसले नाही. आलिया चित्रपटांमध्ये काही खास चमक दाखवू शकणार नाही, असे मानले जात होते. याशिवाय तिला घराणेशाहीबाबत टोमणेही ऐकायला मिळाले. मात्र, आलियाने या चित्रपटासाठी इतरांप्रमाणेच रीतसर ऑडिशन दिल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यासाठी तिला तब्बल 400 लोकांसमोर अभिनय करून दाखवावा लागला होता.
तेव्हा आलिया चांगलीच घाबरली होती. आपली निवड होईल याचीही तिला खात्री नव्हती. मात्र, आता आलियाने तिच्यावरील घराणेशाहीचा आरोप पूर्णपणे खोडून काढला आहे. कारण तिने तिच्या कामाने सर्वांची मने जिंकली आहेत. आलियाने ‘राझी’, ‘गली बॉय’, ‘उडता पंजाब’, ‘गंगूबाई’ आणि ‘2 स्टेट्स’ यासह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. या चित्रपटांमध्ये आलियाने केलेल्या कामाचे सर्वांनी कौतुक केले आहे.