मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टच्या कुटुंबींयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. फुफ्फुसातील संसर्गामुळे नरेंद्रनाथ राजदान यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. नरेंद्रनाथ हे आलियाची आई सोनी राजदान यांचे वडील होते. त्यांच्या निधनानंतर आलिया आणि सोनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. ‘माझं हृदय दु:खाने भरलंय’ असं म्हणत आलियाने आजोबांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
‘माझे आजोबा, माझे हिरो. 93 वर्षांपर्यंत गोल्फ खेळले. 93 वर्षांपर्यंत त्यांनी काम केलं. ते सर्वोत्कृष्ट ऑमलेट बनवायचे, सर्वोत्कृष्ट कथा सांगायचे. त्यांनी वायोलिन वाजवलंय, त्यांच्या पणतीसोबत ते खेळले. त्यांना क्रिकेट, स्केचिंग आणि कुटुंब खूप आवडायचं. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी आयुष्यावर भरभरून प्रेम केलं. माझं हृदय दु:खाने आणि तितकंच आनंदाने भरलंय. कारण माझ्या आजोबांनी आम्हाला फक्त आनंदच दिला. त्यासाटी मी स्वत:ला खूप नशिबवान मानते’, अशा शब्दांत आलियाने भावना व्यक्त केल्या आहेत.
आलियाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या आजोबांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिया मिर्झा, करण जोहर, मसाबा गुप्ता, रिधिमा पंडित यांनी शोक व्यक्त केला आहे.
सोनी राजदान यांनीसुद्धा वडिलांसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘तुम्ही आमच्या हृदयाचा एक तुकडा तुमच्यासोबत घेऊन गेलात, पण आम्ही तुमच्या आत्म्यापासून कधीच दूर जाणार नाही. तुम्ही सतत आमच्यात राहाल आणि जीवंत असण्याचा खरा अर्थ काय याची आठवण आम्हाला करून द्याल. तुम्ही जिथे कुठे असाल, ते ठिकाण आता तुमच्यामुळे अत्यंत आनंदी ठिकाण असेल,’ असं त्यांनी लिहिलं आहे.
आजोबांची प्रकृती ठीक नसल्याचं कळताच आलियाने तिचा कान्स दौरा रद्द केला होता. त्यांच्या शेवटच्या क्षणी सोबत वेळ घालवता यासाठी तिने सर्व कामं पुढे ढकलली होती. आलियाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये तिचे आजोबा 92 वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. यामध्ये रणबीर कपूरसुद्धा आहे.
आलियाचं तिच्या आजोबांशी खूप खास नातं होतं. गेल्या वर्षी त्यांनी लग्नाला हजेरी लावत आलिया-रणबीरला आशीर्वाद दिला होता. लग्नाच्या दिवशी आजोबांना पाहून आलियाच्या डोळ्यांत अश्रू आले होते. तो अत्यंत भावनिक क्षण असल्याचं तिच्या सावत्र भावाने सांगितलं होतं.